Pune : चंदननगर येथे महिलेवर गोळीबाराची सुपारी देणारी संशयित महिला पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – चंदननगर येथे घरात घुसून महिलेवर गोळीबार करण्यात आला होता. या महिलेच्या हत्येची सुपारी देणाऱ्या एका संशयित महिलेला पोलिसांनी दिल्ली येथून ताब्यात घेतले आहे.

संध्या पुरी असे गोळीबाराची सुपारी देणाऱ्या संशयित महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी यापूर्वीच दोन हल्लेखोरांना अत्यंत नाट्यमय घडामोडीनंतर अटक केली आहे. शिवाजी बाबूलाल राव (वय 39, रा.उत्तमनगर) व त्याचा मुलगा मुकेश शिवलाल राव(वय 19, रा.उत्तमनगर) अशी या बापलेकाची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदननगर येथील महिला एकता ब्रिजेश भाटी या महिलेवर गोळीबार करून आरोपी पसार झाले होते. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना ते आरोपी झेलम एक्सप्रेसने दिल्लीला जाणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी पुणे रेल्वे स्टेशनवर सापळा रचून दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्यावर गोळीबार केला. मोठ्या शिताफीने दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले.

चौकशी दरम्यान शिवलाल आणि मुकेश हे बापलेक असल्याचे निष्पन्न झाले. तपासादरम्यान महिलेला मारण्याची सुपारी देणाऱ्या संशयित महिलेस पोलिसांनी दिल्लीतून ताब्यात घेतले. मात्र सुपारी देण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतु अर्थिक मतभेदांमुळे हा सर्व प्रकार घडला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.