Pune : मुठा कालवा दुर्घटनेत 15 जणांचे प्राण वाचविणाऱ्या ‘लेडी सिंघम’ नीलम गायकवाड (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- पुण्यात गुरुवारी मुठा उजवा कालवा फुटला आणि कालव्यातून प्रचंड वेगात वाहणाऱ्या पाण्याने दांडेकरपूल झोपडपट्टीतील घरांचा घास घेतला. या घटनेच्यावेळी आपल्या जिवाची पर्वा न करता वाहत्या पाण्यातून १५ जणांचे प्राण वाचविणाऱ्या ‘लेडी सिंघम’ची सध्या शहरात चर्चा आहे. नीलम भारत गायकवाड असे या ‘लेडी सिंघम’चे नाव आहे. नीलम गायकवाड या दत्तवाडी पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. आज त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत असून दत्तवाडी पोलीस ठाण्यामध्ये त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. काल घडलेली थरारक घटना त्यांच्याच शब्दात……

“काल दत्तवाडी पोलीस चौकीत कर्तव्यावर असताना दांडेकर पूल परिसरात घडलेल्या घटनेची माहिती फोनवर मिळताच ताबडतोब आम्ही सर्व कर्मचारी घटनास्थळी पोहचलो. या ठिकाणी चारही बाजूने प्रचंड वाहतूक कोंडी आणि पाण्याचा जोरदार प्रवाह येताना दिसला. या पाण्यातून चालू शकणार नाही अशी भयानक परिस्थिती होती. ज्याठिकाणी पाणी प्रचंड वेगात उतरत होते त्या ठिकाणी मी गेले असता तिथे काही लहान मुले आणि वृद्ध अडकले असल्याचे समजले. त्यांना तेथून काढणे देखील खूपच कठीण होते कारण पाण्याचा वेग प्रचंड होता. लहान मुलांना तर तेथून बाहेर येण्याचा काही मार्गच उरला नव्हता. त्यांना बाहेर काढणे आवश्यक होते ते तेथे थांबले असते तर पाण्याच्या प्रवाहसोबत वाहून गेले असते. शेवटी धाडस करून स्थानिक लोकांची मदत घेऊन दोरीच्या साहाय्याने मी स्वतः पाण्यात शिरले आणि जवळपास 15 लोकांना त्या प्रवाहामधून बाहेर काढले. लहान मुलांना आपल्या पाठीवर घेऊन त्यांना सुखरूप बाहेर काढले ”

” खरं तर हे काम लवकर झालं असत पण मदत करण्याऐवजी अनेक लोक हे फोटो आणि व्हिडिओ काढण्यात व्यस्त होती. पाण्यात उतरून लोकांना मदत करायला फार कमी लोक पुढाकार घेत होते याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. नीलम गायकवाड यांच्या धाडसाचे पोलीस दलात सर्वत्र कौतुक होत आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त के वेंकटेशम यांनी ट्विट करून नीलम गायकवाड यांचे कौतुक केले. ‘ म्हणूनच स्त्रीला शक्ती म्हणतात. आमच्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा अभिमान आहे’ असे त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.

आज महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या मनीषा धारणे यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात नीलम गायकवाड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे उपस्थित होते.

“पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करत असतो. कालच्या घटनेमध्ये ज्या प्रकारे आमच्या कर्मचा-यांनी आपले कर्तव्य पार पाडले त्याचा मला सार्थ अभिमान आहे” असे देवीदास घेवारे म्हणाले.

  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.