Pune: ससून रुग्णालयाची सूत्रे जमाबंदी आयुक्त एस चोक्कलिंगम यांच्याकडे!

Pune: Land Settlement commissioner S Chokkalingam will be new in-charge of Sassoon Hospital

एमपीसी न्यूज – पुण्यातील बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकार राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण खात्याने जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम यांच्याकडे सोपविले आहेत.

शहरात कोरोना संसर्ग वाढल्याने तसेच त्यामुळे होणाऱ्या वाढत्या मृत्यूंमुळे राज्य सरकारवर टीका होऊ लागली होती. त्या पार्श्वभूमीवर ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले यांची गेल्या महिन्यात तडकाफडकी करण्यात आली आणि ससूनचा कारभार विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडे सोपविण्यात आला.

वैद्यकीय शिक्षण खात्याने गुरुवारी पत्रक काढून डॉ.म्हैसेकर यांच्याकडील कार्यभार चोक्कलिंगम यांच्याकडे सोपविला. चोक्कलिंगम यांनी यापूर्वी पुण्याचे विभागीय आयुक्त व राज्याचे शिक्षण आयुक्त म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ससून रुग्णालयाच्या कारभाराचा गाडा रुळावर आणण्याचे मोठे प्रशासकीय आव्हान चोक्कलिंगम यांच्यासमोर असणार आहे.

ससून रुग्णालयाच्या नव्या इमारतीत विशेष कोरोना रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. पुण्यातील सर्वाधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू हा ससून रुग्णालयात झाल्यामुळे ससून रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पार्श्वभूमीवर ससून रुग्णालयाची प्रशासकीय घडी व्यवस्थित बसवून अधिक चांगली व विश्वासार्ह रुग्णसेवा उपलब्ध करून देण्यासाठी चोक्कलिंगम यांना परिश्रम करावे लागणार आहेत.

पुणे विभागाची जबाबदारी म्हैसेकर यांच्याकडे आहे. विभागातील आपत्कालीन स्थिती लक्षात घेता म्हैसेकर यांच्यावरील ससूनचा अतिरिक्त भार कमी केला असावा असे मानले जाते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.