Pune : खते, पशुखाद्य, शालेय पोषण आहाराचे गोदाम फोडून लाखोंचा माल चोरणाऱ्या टोळीला एलसीबीकडून अटक

वालचंदनगर, इंदापूर आणि टेंभुर्णी येथील तीन गुन्हे उघडकीस

एमपीसी न्यूज – खते, पशुखाद्य आणि शालेय पोषण आहाराचे एकूण तीन गोडाऊन फोडून लाखो रुपयांचा माल चोरून नेणाऱ्या पाच जणांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अटक केली. वालचंदनगर, इंदापूर आणि टेंभुर्णी येथील तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

ऋषीकेश किसन चव्हाण (वय 24, रा. लवंग, पाटीलवस्ती ता. माळशिरस जि.सोलापूर), संदिप जितेंद चव्हाण (वय 21, रा. तांबवे, चव्हाण वस्ती, ता. माळशिरस जि. सोलापूर), योगेश चांगदेव गुटाळ (वय 24, रा. तांबवे, 25/4 फाटा, ता. माळशिरस, जि.सोलापूर), उज्वल धनंजय निंबाळकर (वय 20, रा. पंधारवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे), विशाल सुरेश थोरात (वय 20, रा. रेडणी, ता. इंदापूर, जि. पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 मार्च रोजी अकलूज रोड, इंदापूर येथील बाजार समितीच्या शेजारी असलेले खताचे गोडाऊन चोरट्यांनी फोडले. गोडाऊनमधून 1 लाख 36 हजार 490 रुपयांच्या खताच्या बॅग चोरट्यांनी चोरून नेल्या. याबाबत संजय चंद्रकांत दोशी (रा. इंदापूर, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

इंदापूर पोलिसांसोबत एलसीबीने देखील या गुन्ह्याचा समांतर तपास केला. एलसीबीच्या पोलिसांना आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यानुसार इंदापूर तालुक्यातील बावडा येथे सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. इंदापूर येथे केलेल्या चोरीबाबत चौकशी करत असताना आरोपींनी 19 मार्च रोजी पिटकेश्वर येथील गोडावूनचे पाठीमागील शटर उचकटून पशुखादयाची पोती चोरल्याचे, त्यानंतर सुमारे 10 दिवसांनी इंदापूर मार्केटयार्ड येथील दरवाजाचे कडीकोयंडा तोडून खताच्या गोण्या चोरल्याचे व सुमारे 20 दिवसांपूर्वी टेंभूर्णी एमआयडीसी येथील शालेय पोषण आहार गोडावूनचे शटर उचकटून धान्य, डाळी, तांदूळ, तेल, मसाले इत्यादी माल आयशर टेम्पोसह चोरी केल्याचे सांगितले आहे.

इंदापूर, वालचंदनगर, टेंभुर्णी पोलीस ठाण्यातील तीन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींना पुढील कारवाईसाठी इंदापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, पोलीस कर्मचारी महेश गायकवाड, निलेश कदम, उमाकांत कुंजीर, सचिन गायकवाड, गुरु गायकवाड, प्रविण मोरे, क्षिरसागर, ‍काशिनाथ राजापुरे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.