Pune : टाकाऊ पदार्थाचा अधिकाधिक पुनर्वापर व्हावा – राजेंद्रकुमार सराफ

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रीयन गृहिणी प्रक्रिया करून शिळे अन्न पुन्हा खाण्यास वापरतात. परंतु सध्या पारंपरिक जीवनशैली लुप्त पावत आहे. त्यामुळे फास्ट फूड व युज अँड थ्रो अशा वस्तूंचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, टाकाऊ पदार्थांचा पुनर्वापर कमी होतो आहे. दैनंदिन जीवनात आपण वापर करत असलेल्या अनेक घटकांचा पुनर्वापर शक्य आहे. त्यामुळे टाकाऊ पदार्थांचा अधिकाधिक पुनर्वापर व्हायला हवा, असे प्रतिपादन मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष आणि पर्यावरण अभियंता राजेंद्रकुमार सराफ यांनी केले.

मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग आणि दि इंस्टीट्यूशन ऑफ इंजिनियर्स (इंडिया) पुणे यांच्या संयुक्त विदयमाने ‘अभियांत्रिकीतील नोकरी-व्यवसायाच्या संधी’ व्याख्यानमालेतील दुसऱ्या सत्रात आज टाकाऊ पदार्थांपासून मूल्यवर्धित वस्तूंची निर्मिती’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते, त्यावेळी राजेंद्रकुमार सराफ बोलत होते.

उपलब्ध संसाधनाचा कमीत कमी वापर करणे हा भारतीय जीवनशैलीचा अविभाज्य भाग होता. परंतु तो आता नामशेष झाला आहे. पूर्वी अनेक गोष्टींचा पुन्हा पुन्हा वापर केला जात असल्याने पर्यावरण संतुलन देखील राहत होते. आपल्या अवती भोवती अनेक घटक आहेत, ज्यांचा वापर करून नवीन व्यवसाय करता येऊ शकतो. त्यामध्ये टाकाऊ निर्माल्यापासून विविध प्रकारच्या अगरबत्ती, मानवी विष्ठेपासून सोनखत, पाण्याचा पुनर्वापर, अंड्याच्या छिलक्यापासुन प्रसाधने सारख्या नावगोष्टींची निर्मिती शक्य आहे असे सराफ म्हणाले.

या कार्यक्रमावेळी उपाध्यक्ष डॉ. नीलिमा राजुरकर, विनय आर आर,अविनाश निघोजकार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नीलिमा राजुरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन अविनाश निघोजकार यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.