Pune : लीला पूनावाला फाउंडेशनतर्फे सुमारे 1000 कुटुंबांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूवाटप

Leela Punawala Foundation distributes food and essential items to more than 1000 families

एमपीसी न्यूज –  कोरोनामुळे बरीच  कुटुंब  आर्थिक संकटाच्या कचाट्यात सापडली आहेत. दैनंदिन खर्च जीवन आवश्यक गोष्टी परवडेनाशा झाल्या आहेत कित्येक लोकांचे रोजगार बंद झाले आहेत. लीला पूनावाला फाऊंडेशन गरजू कुटुंबाना मदत करण्यासाठी पुढे सरसावले असून लीला पूनावाला फाउंडेशनतर्फे (LPF) आतापर्यंत 1000 हून अधिक कुटुंबांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

लीला पूनावाला फाऊंडेशनचे संस्थापक व विश्वस्त फिरोज पूनावाला यांनी अ‍ॅनसिस सॉफ्टवेयर प्रा. लि. यांच्या सहयोगाने शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या आणि ज्यांना या आपत्तीचा सर्वाधिक फटका बसला आहे. अशा 150 मुलींच्या कुटुंबांना धान्यवाटप केले. या वेळी फाऊंडेशनच्या वतीने मुली आणि त्यांच्या कुटुंबीयांना एक महिन्याचा शिधा पुरवठा करण्यात आला. यापूर्वीही फाऊंडेशनने कोवीड-19 विरूद्ध लढ्यात सहभागी होऊन पीडित कुटुंबांची मदत केली आहे.

फाऊंडेशनच्या वतीने अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले गेले. ज्यामध्ये गव्हाचे पीठ, तेल, तांदूळ, वाटाणे, हरभरा, रवा, शेंगदाणे, तांदूळ, गूळ, साखर, बिस्किटे यांचा समावेश असलेले किट वाटप करण्यात आले.

फिरोज पूनावाला म्हणाले, LPF ने 1000 हून अधिक गरीब मुलींच्या कुटुंबांना आवश्यक किराणा वितरण केले आहे. तसेच परिस्थिती सामान्य होईपर्यंत हे काम सुरूच राहणार आहे. गरजू कुटुंबाना आमच्याकडून नेहमीच शक्य ती मदत मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

भारत आणि साऊथ एशिया पॅसिफिक अ‍ॅनसीसचे एरिया व्हाईस प्रेसिडेंट रफिक सोमानी म्हणाले, लीला पूनावाला फाउंडेशनच्या चांगल्या कार्यास पाठिंबा देऊन एक छोटी परंतु महत्त्वपूर्ण भूमिका निभावण्यास मिळाली यासाठी आम्ही आनंदी आहोत. आम्ही आशा करतो की, या प्रयत्नामुळे गरजूंना या कठीण परिस्थितीमध्ये उपजिवीका पूर्ण करण्यास मदत होईल. लीला पूनावाला फाऊंडेशनच्या सक्रिय कार्याचे आम्ही कौतुक करतो, असे त्यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.