Pune : पानशेत परिसरात बिबट्याचा थरार…

मंदिराचा पुजारी जखमी; वनविभागाची कसरत सुरु, नागरिकांना सावधानतेचा इशारा

एमपीसी न्यूज – हवेली तालुक्यातील पानशेत आणि परिसरातील निगडे गावाच्या आसपास बुधवारपासून बिबट्याचा वावर पाहायला मिळत आहे. या बिबट्याने एका मंदिराच्या पुजा-यावर हल्ला केला असून वृद्ध पुजारी जखमी झाला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वेल्हे वनविभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

वेल्हे वनविभागाच्या अधिकारी आशा भोंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री निगडे येथील स्थानिक नागरिकांना बिबट्या दिसला. पहाटे त्याने एका वृद्धावर हल्ला केला असून यामध्ये वृद्ध जखमी झाला आहे. वृद्धावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत वेल्हे वनविभागाला माहिती मिळताच दोन अधिकारी आणि पथकाला तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे. परिसराचा आढावा घेऊन बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

  • सावधान, बिबट्या आलाय…
    निगडे, पानशेत परिसरात यापूर्वी बिबट्याचा कधी वावर दिसला नाही. बिबट्या आढळण्याची ही पहिली वेळ आहे. या परिसरात बिबट्या कुठून आला? याबाबत देखील तपास सुरु आहे. परिसरातील नागरिकांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. वनविभागाचे अधिकारी लोकांमध्ये जनजागृती करून त्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असल्याचेही भोंग यांनी सांगितले.

ओसाडजाई मंदिरातील पुजा-यावर हल्ला
खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ओसाडे गावाजवळ ओसाडजाई देवीचे मंदिर आहे. छबन महादेव जोरकस (वय 66) हे त्या मंदिराचे पुजारी आहेत. छबन जोरकस बुधवारी रात्री मंदिराच्या समोर झोपले होते. रात्री अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. जोरकस या हल्ल्यात जखमी झाले. त्यांनी आरडाओरडा करून घरच्यांना जागे केले. सर्वांनी मिळून बिबट्याला हुसकावून लावले. वृद्ध पुजा-याला उपचारासाठी खडकवासला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.