Pune : राजकीय इच्छाशक्ती, सकारात्मकता, आत्मविश्वास या त्रिसूत्रीतून कोरोनाविरोधात यशस्वी होऊ : नितीन गडकरी

Let's succeed against Corona through political will, positivity, self-confidence: Nitin Gadkari

एमपीसी न्यूज – ‘देश आर्थिक संकटातून चालला आहे. कोरोनाची लढाई महत्वाची आहे. यामध्ये आपल्याला यश मिळेल. जोपर्यंत लस मिळत नाही तोपर्यंत लढायचे आहे. नकारात्मकता, नैराश्यावर मात करायची आहे. मजबूत राजकीय इच्छाशक्ती, सकारात्मकता आणि आत्मविश्वास या त्रिसुत्रीतून कोरोनाविरोधात यशस्वी होऊ, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

‘महाराष्ट्र जनसंवाद’ या व्हर्च्युअल रॅलीत पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या २० हजाराहून अधिक बूथ प्रमुख आणि वीस लाखांहून अधिक नागरिकांना मार्गदर्शन करताना गडकरी बोलत होते. मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील प्रथम वर्षपूर्तीनिमित्त या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेश प्रभारी सरोज पांडे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, सुभाष देशमुख, सदाभाऊ खोत, चंद्रशेखर बावनकुळे, सुरेश हळदणकर, खासदार गिरीश बापट, पुणे शहर भाजप अध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, मुक्ता टिळक, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दीपक नागपुरे, युवा मोर्चाचे अध्यक्ष दीपक पोटे, महिला आघाडीच्या अध्यक्षा शशिकला मेंगडे आदी पदाधिकारी या रॅलीत सहभागी झाले होते.

नितीन गडकरी म्हणाले, ‘अस्पृश्यता, जातीयता, सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर करायची आहे. सुखी संपन्न, समृद्ध राष्ट्रनिर्मितीसाठी सुशासन आणि विकास साधायचा आहे. त्यासाठी ई -गव्हर्नन्स महत्वाचे आहे.

अंत्योदय ही प्रेरणा व जीवननिष्ठा आहे. पं. दीनदयाळ उपाध्याय यांना अपेक्षित समाजातील दरिद्र नारायणाला देव माणूस मानून त्याची सेवा करावी. रोटी, कपडा, मकान मिळावे हे आपली जीवन निष्ठा आहे. कार्यकर्त्यांचे चाल, चलन आणि चरित्र महत्वाचे आहे.’

देशाच्या हितासाठी पंतप्रधानांनी कठोर निर्णय घेतले. त्यात राजकारण केले नाही. संघर्षात यशस्वी होण्यासाठी सकारात्मकता महत्वाची आहे. ते आपल्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य आहे. ती निर्माण करण्याची जबाबदारी कार्यकर्ते आणि नेत्यांची आहे.

सुखी, समृद्ध राष्ट्र निर्मितीसाठी केवळ राज्य बदलायचे नाही तर समाज बदलायचा आहे. समाजाचे सामाजिक, आर्थिक परिवर्तन झाले पाहिजे. राजकारण हे त्याचे माध्यम आहे. देशाची बाह्य आणि अंतर्गत सुरक्षा महत्वाची आहे. कॉंग्रेसने मात्र मतपेढीचे राजकारण केल्याची टीका केंद्रीय मंत्री गडकरी यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.