Pune: तरुणांनी भवताल समजून घ्यावे – दादा इदाते

एमपीसी न्यूज – स्पर्धेच्या युगामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा सर्रासपणे वापर केला जातो. तरुण पिढीला तंत्रज्ञानाची पूर्णतः माहिती असते. परंतु, भवतालच्या घडामोडी, समाजातील प्रतिकूल परिस्थिती याबाबतही माहित असणे अपेक्षित आहे. त्यामुळे तरुणांनाही प्रत्येक गोष्टीतील सत्यता माहिती करून घ्यावी, असे मत राष्ट्रीय विमुक्त जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष भिकूजी उर्फ दादा इदाते यांनी व्यक्त केले.

घोले रस्त्यावरील नेहरू सांस्कृतिक केंद्रातील राजा रवी वर्मा कलादालनात जयहिंद परिवार आणि लाईफस्टार ग्लोबल रिसर्च फाउंडेशतर्फे आयोजित भारतदर्शन राष्ट्रीय महोत्सव 2018 या दोन दिवसीय महोत्सवात इदाते बोलत होते. याप्रसंगी दिग्दर्शक निर्माते मुकेश कणेरी, अभिनेत्री देविका दफ्तरदार, चैताली चटर्जी, नृत्यांगना मधुमिता मिश्रा, सतीश खर्डे पाटील, संयोजक नारायण फड, नेहा जोशी, रिता शेटीया, हसन शेख उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

दादा इदाते म्हणाले, “जगात विविध प्रकारची बुद्धिमत्ता असलेली माणसे आहेत. त्यात वाईट माणसे सक्रिय व चांगली माणसे निष्क्रिय आहेत. त्यामुळे चांगल्या माणसांनी पुढाकार घेऊन सकारात्मक गोष्टींचा प्रसार केला पाहिजे. समाजातील गरजूना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम नारायण फड यांच्यासारखे करीत आहेत, याचे समाधान आहे. अशा कार्यक्रमातून वंचित घटकांतील लोकांनाही आपल्या कलेला विकसित करण्याची संधी मिळेल”

देविका दफ्तरदार म्हणाल्या, “कला माणसाला जगायला शिकवते. देशभरातून अनेक ठिकाणाहून कलाकार येथे आले आहेत. त्यांच्या कला व त्यांच्याविषयी जाणून घेता आले. कलेचे महत्व ओळखून आपण एखादी कला जोपासली पाहिजे”

भारतदर्शन राष्ट्रीय महोत्सवाचा समारोप व पुरस्कार वितरण सोहळ्याच्या समारोप प्रसंगी “उद्योगक्षेत्र, प्रशासकीय क्षेत्र, कला, आरोग्य, साहित्य अशा कोणत्याही क्षेत्रात काम करताना सामाजिक जाणीव आणि बांधिलकी जपणे गरजेचे आहे. समाजहितासाठी प्रत्येकाने आपला वाटा उचलला पाहिजे” असे प्रतिपादन बालहक्क संरक्षण हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी फुलचंद चाटे, आबासाहेब नागरगोजे, स्वामी डॉ. तुळशीरामजी गुट्टे महाराज, सुरेश कोते, अमित जमतामी, सुनिल जायभाय आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या महोत्सवात दोन दिवसीय कला व हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रवीण घुगे म्हणाले, “कोणत्याही प्रकारचे ध्येय साध्य करण्यासाठी परिस्थिती कधीही आडवी येत नसते. तुमचा हेतू चांगला असेल आणि प्रचंड मेहनत करण्याची तळमळ असेल तर समाजामध्ये निश्चीत चांगले बदल घडवून आणता येतात. समाजातील विविध क्षेत्रात काम करणा-या व्यक्तींना कौतुकाची थाप देऊन त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी अशा प्रकारच्या पुरस्कारांचे आयोजन होणे उपयुक्त ठरते” या दोन दिवसीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिता शेटीया यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.