Pune : ‘एक्झिट’पेक्षा ‘एक्झॅक्ट पोल’ महत्वाचे- प्रकाश जावडेकर

श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड संस्थेचा सुवर्णमहोत्सव

एमपीसी न्यूज- एक्झीट पोल ही एक चर्चा आहे. ही चर्चा खुशाल व्हावी. मात्र, अकरा तारखेला खरे चित्र समोर येणार असून एक्झिटपेक्षा एक्झॅक्ट पोल महत्वाचा आहे, असे म्हणत मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांंनी एक्झिट पोलवर होणाऱ्या चर्चेला पूर्णविराम दिला. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगडसह पाच राज्याच्या निवडणुकांच्या अनुषंगाने एक्झिट पोल काँग्रेसच्या बाजूने झुकलेले पाहायला मिळत आहेत. त्यावर बोलताना जावडेकर यांनी वरील प्रतिक्रिया दिली. श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापडच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात ‘लिज्जत रत्न’ पुरस्कारांचे वितरण त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

गणेश कला क्रीडा मंच येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, वनराईचे अध्यक्ष गिरीश गांधी, सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुमार सप्तर्षी, ‘लिज्जत पापड’च्या संस्थापिका जसवंती बेन, अध्यक्षा स्वाती पराडकर, उपाध्यक्षा प्रतिभा सावंत, संचालक सुरेश कोते, संचालिका सुमन दरेकर, कमल कोळगे, विमल कांबळे, रत्नमाला जाधव, मंदाकिनी दाखवे, चेतना नहार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी दि महाराष्ट्र राज्य अर्बन को. ऑप. बँक फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, साहित्यिका डॉ. मनिषा पोतदार, ‘सरहद’ संस्थेचे संजय नहार, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या मुक्ता पुणतांबेकर, कर्नल हेमंत दरेकर, सामाजिक कार्यकर्ते राहुल देशमुख, ‘भोई प्रतिष्ठान’चे डॉ. मिलिंद भोई, स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपचे सचिन ईटकर, पत्रकार अलका धूपकर, हालिमा कुरेशी यांना ‘लिज्जत रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

प्रकाश जावडेकर म्हणाले, “महिलांमध्ये सातत्य, चिकाटी, वात्सल्य, शिस्त आणि स्वाभिमान दडलेला असतो. त्यांच्यातील अंगभूत कौशल्य ओळखून ‘लिज्जत’ परिवाराने त्यांना ओळख दिली आणि स्वावलंबी बनवले. मेहनत आणि स्वाभिमानाच्या जोरावर गरीब व्यक्तीही मोठ्या पदावर जाऊ शकतो, हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या रूपाने गरिबांचा सन्मान झाला आहे. एखाद्याला पकोडेवाला म्हणून हिणवणे सोपं असतं.  मात्र तो स्वत:चा व्यवसाय करून स्वाभिमानानं जगत असतो हे लक्षात ठेवावं लागेल. श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड बनवणाऱ्या महिला अशाच प्रकारे स्वाभिमानाचं आयुष्य जगत आहेत. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी हेदेखील चहा विकायचे. ते आज पंतप्रधान झाले आहेत. तंत्रज्ञानामुळे सेवा क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत. मुद्रा लोनमुळे छोट्या व्यावसायिकांना रोजगार मिळाला आहे. शासनाकडून येणारा प्रत्येक पैसा ग्राहकापर्यंत जात आहे.”

सुभाष देशमुख म्हणाले, “स्वयंरोजगारातून विकास साधलेल्या या महिला आहेत. त्यांच्या मेहनतीला सलाम करावा वाटतो. सध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे. त्याचा सामना करण्यासाठी महिलांची मदत होऊ शकते. 50 हजारांना महिला एकत्रितपणे चांगले काम उभारू शकतात, हे लिज्जत पापडने दाखवून दिले आहे.”

गिरीश बापट म्हणाले, “अनेक व्यवसाय सुरू होतात आणि बंदही होतात. मात्र, सलग 50 वर्षे काम करत राहणारा आणि दिवसेंदिवस प्रगती करत असणारा लिज्जत पापड समूह खऱ्या अर्थाने चिरंतर आहे. महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणाऱ्या या समूहाने आणखी मोठे कार्य उभारावे.”

प्रास्ताविक करताना संस्थेच्या अध्यक्षा स्वाती पराडकर म्हणाल्या, “सात महिलांपासून सुरु झालेला प्रवास आता 50 हजार महिलांच्या समूहात परावर्तित झाला आहे. या सगळ्या भगिनी आत्मनिर्भर झाल्या आहेत, याचे समाधान आहे”

राहुल सोलापूरकर, माया प्रभुणे यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश कोते यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like