Pune : विविध मागण्यांसाठी लिंगायत समाजाचा पुण्यात 15 सप्टेंबरला राज्यव्यापी महामोर्चा

लिंगायत समन्वय समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. अविनाश भोसीकर यांची माहिती

एमपीसी न्यूज – लिंगायत स्वतंत्र धर्माला मान्यता, महात्मा बसवेश्वर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक आणि राष्ट्रीय स्तरावरील अल्पसंख्याक दर्जा अशा मागण्या सरकारने पूर्ण कराव्यात. यासाठी 15 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता पुणे येथे लिंगायत समाजाचा राज्यव्यापी महामोर्चा निघणार आहे. लिंगायत समन्वय समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. अविनाश भोसीकर यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी राष्ट्रीय संचालक जगद्गुरू चन्नबसवानंद महास्वामी, राष्ट्रीय उपाध्यक्ष सुधीर सिंहासने, केंद्रीय सदस्य विरेंद्र मंगलके, बाळासाहेब होनराव, सतिशकुमार पाटील आदी उपस्थित होते.

  • यावेळी भोसीकर म्हणाले, हा मोर्चा महात्मा बसवेश्वर पुतळा बाजीराव रस्ता येथून सुरू होणार असून शनिपार चौक, लक्ष्मी रस्ता मार्गे विभागीय आयुक्तालयाकडे जाणार आहे. धर्माला संविधानिक मान्यता आणि अल्पसंख्याक दर्जा मिळावा, याकरिता तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, केरळ राज्यातील विविध संघटनांना एकत्र करून लिंगायत समन्वय समितीची स्थापना केली आहे.

याअगोदर समितीच्या नेतृत्वाखाली लाखोंच्या संख्येने मोर्चे निघाले आहेत. परंतु आमच्या मागण्यांविषयी सरकारने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही.

  • लिंगायत धर्मियांच्या तीव्र भावना सरकारला कळाव्यात, यासाठी मोर्चात पुणे जिल्हा आणि राज्यभरातून लाखो लिंगायत सहभागी होणार आहेत, असे सिंहासने यांनी यावेळी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.