Pune : प्रदूषणविरहित गणेश विसर्जनासाठी ‘लायन्स क्लब’चा पुढाकार; जिल्हाध्यक्ष लायन किशोर मोहोळकर यांची माहिती

एमपीसी न्यूज – दहा दिवस आनंदाने आपल्या बाप्पाची सेवा केल्यानंतर त्याचे विसर्जन प्रदूषण विरहित व्हावे, यासाठी द लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी 2 संस्थेच्या वतीने पुढाकार घेतला आहे.

पर्यावरणाची हानी आणि नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी गणपती विसर्जन काळात ‘प्रदूषण विरहित विसर्जनाचा श्रीगणेशा’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील ३२ लायन्स क्लब सहभागी होणार आहेत, अशी माहिती लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या जलप्रदूषण विभागाचे जिल्हाध्यक्ष लायन किशोर मोहोळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी किशोर मोहोळकर,अनिल मंद्रुपकर,सागर भोईटे,अनिल मंद्रुपकर आदी उपस्थित होते.

यावेळी किशोर मोहोळकर म्हणाले, “प्रांतपाल ओमप्रकाश पेठे यांच्या मार्गदर्शनाखाली व किशोर मोहोळकर यांच्या नेतृत्वाखाली ‘प्रदूषण विरहित विसर्जनाचा श्रीगणेशा’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून गणपती उत्सव काळात होणाऱ्या पर्यावरण हानीबद्दल जनजागरण केले आहे. मराठी व इंग्रजी भाषेतील सुमारे ८००० पत्रके वाटली.

पुणे व पिपरी चिंचवडमध्ये शंभरच्यावर फ्लेक्स लावले आहेत. यात प्रामुख्याने धातूच्या कायम स्वरूपाच्या मूर्ती बनवून घ्या, मूर्ती दान करा असे आवाहन करण्यात आले आहे. प्लॅस्टिक कलरचे तोटे आणि घरच्या घरी मूर्ती विसर्जन करण्याची पद्धती यावर भर दिला आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे घरच्या घरी अमोनियम बायकार्बोनेट (खाण्याचा सोडा)चा वापर करुन विसर्जन करणे, अमोनियम सल्फेटचा वापर करून त्याचे खतात रूपांतर करण्याचे प्रात्यक्षिक आणि अमोनियम बायसल्फेटचे घरोघरी आणि सोसायट्यामध्ये वाटप करून जनजागृती करणे व प्रोत्साहन देणे, यावर भर दिला आहे.”

त्यानंतर सागर भोईटे म्हणाले, महानगरपालिकेकडून शंभरपेक्षा जास्त सदस्य असलेल्या सोसायटीची यादी घेऊन पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील सोसायटीमध्ये प्रात्याक्षिक दाखवण्यात आले. १३० पोती (प्रत्येक पोत्यात २५ किलो पावडर) म्हणजे ३२५० किलो सोडियम बायकार्बोनेट पावडर वाटण्यात आली आहे. म्हणजे प्रत्येक घरगुती गणपती विसर्जनासाठी सरासरी एक किलो पावडर वापरली गेली, तर किमान 2000 गणपतीनचे विसर्जन घरातच होईल आणि २००० किलो पीओपी नदी-तलावात जाणार नाही. परिणामी नदीप्रदूषण कमी होईल. ५० पेक्षा जास्त विदयार्थ्यांनीही मदत केली आहे. विसर्जनानंतर ही पावडर हौदात टाकण्यात येणार आहे.”

अनिल मंद्रुपकर म्हणाले, श्री फाउंडेशनच्या सहकार्याने पुण्यातील विविध घाटावर गणपती मूर्तीदान देण्यासाठी आव्हान करण्यात येणार आहे. पुण्यातील राजाराम पूल, निलायम टॉकीज घाट, खराडी येथे पाच गाड्या मूर्ती वाहतुकीसाठी उपलब्ध केल्या आहेत. पुण्यातील व पिंपरी चिंचवड येथील विविध घाटावर निर्माल्य गोळा करून त्याचे जागेवरच कंपोस्ट मशीनच्या साह्याने खातात रूपांतर करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.