Pune : लाईव्ह सर्जिकल वर्कशॉपमध्ये कर्करोगामुळे स्वरयंत्र गमावलेल्या रूग्णाचा आवाज परतला

एमपीसी न्यूज- इंडियन मेडीकल असोसिएशन व स्टर्लिंग हॉस्पिटलतर्फे आयोजित दोन दिवसीय हेड-नेक सर्जरीच्या लाईव्ह सर्जिकल वर्कशॉपमध्ये कर्करोगामुळे स्वरयंत्र गमावलेल्या रुग्णाचा आवाज परत येण्यासाठी कृत्रिम स्वरयंत्र बसवण्याच्या यशस्वी शस्त्रक्रियेचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

बालेवाडी येथे झालेल्या वर्कशॉपमध्ये महाराष्ट्र व गोव्यातील सुमारे 350हून अधिक शल्यचिकित्सक व कान-नाक-घसा तज्ज्ञ सहभागी झाले होते. वर्कशॉप स्टर्लिंग हॉस्पिटल निगडी व इंडियन मेडिकल असोसिएशन पिंपरी-चिंचवड-भोसरी शाखेच्या संयुक्त विद्यमाने ४ व ५ ऑगस्ट रोजी घेण्यात आले होते.

मुंबई येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक व हेड-नेक कॅन्सर विभागप्रमुख डॉ. अनिल डिक्रुज, हिंदुजा हॉस्पिटलचे डॉ. मुराद लाला, अंबानी हॉस्पिटलचे डॉ. मंदार देशपांडे व नागपूर येथील डॉ. मदन कापरे या प्रसिद्ध कॅन्सर सर्जन्सच्या उपस्थितीत थायरॉईड व स्वरयंत्रावरील कर्करोगाच्या अतिशय अवघड शस्त्रक्रिया निगडी येथील स्टर्लिंग हॉस्पिटलमध्ये पार पडली. प्रथमच अशा शस्त्रक्रियेचे थेट प्रक्षेपण बालेवाडी येथील वर्कशॉपमध्ये उपस्थित डॉक्टरांना पाहता आले. या तज्ज्ञांनी उपस्थित डॉक्टरांना टप्याटप्याने मार्गदर्शन केले.

या शस्त्रक्रियेविषयी बोलताना डॉ. अनिल डिक्रूज म्हणाले की, हेड-नेक कॅन्सर तरुणांमधील मृत्यूचे एक प्रमुख कारण असून यामध्ये योग्य वेळी निदान होणे व योग्य उपचार मिळणे अतिशय महत्त्वाचे आहे.

प्रमुख आयोजक कॅन्सर सर्जन डॉ. राकेश नेवे म्हणाले की, असे उपक्रम पिंपरी-चिंचवडमध्ये प्रथमच करण्यात आला व स्टर्लिंग हॉस्पिटलने हा उपक्रम मोफत राबविला. अशा कार्यशाळांमुळे उद्योन्मुख शल्यचिकित्सकांना खूप फायदा होईल. या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया मोफत केल्याबद्दल रुग्णांनी आयोजकांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.