Pune : लॉकडाऊन पुणेकरांच्या हितासाठी, भाजपने अजित पवार यांच्यावर विनाकारण टीका करू नये : दीपाली धुमाळ

Lockdown for the benefit of Punekars, BJP should not criticize Ajit Pawar without any reason: Deepali Dhumal : लॉकडाऊनला सर्वांनी सहकार्य करावे

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. या कालावधीत पुणेकरांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी कोरोनाची साखळी तोडणे गरजेचे आहे. त्यामुळेच उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी 10 दिवस कडक लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. त्यांच्या निर्णयाचे स्वागत करण्याऐवजी भाजपचे खासदार गिरीश बापट, शहराध्यक्ष जगदीश मुळीक टीका करीत आहेत. त्यांचे हे वागणे बरोबर नसल्याचा हल्लाबोल विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी केला.

पुणे महापालिकेत भाजपची एक हाती सत्ता आहे. त्यांचे प्रशासनावर कोणतेही अंकुश नाही. त्याउलट अजित पवार दररोज पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतात. दर आठवड्याला बैठक घेऊन उपाययोजना करतात.

मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट पुण्यात निर्माण झाले आहे. या कालावधीत खासदार गिरीश बापट आणि महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी पुणेकरांना काय दिलासा दिला. कोणत्या उपाययोजना केल्या, याचा खुलासा त्यांनी करावा.

इतर शहरात सुध्दा लाॅकडाऊन पुन्हा लावण्यात आला आहे. या लाॅकडाऊनच्या कालावधीत नवीन आयुक्त, प्रशासन, सत्ताधारी व सर्व पक्ष गटनेते यांची संयुक्त बैठक घैऊन काय उपाययोजना करायच्या, याकडे लक्ष दिले पाहिजे. टिकाटिपन्नी करण्यापेक्षा कोरोनाचा प्रादुर्भाव कसा कमी करता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

पुणे शहरात आता कोरोनाचे 27 हजार 525 रुग्ण झाले आहेत. 17 हजार 482 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 840 नागरिकांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. 9 हजार 203 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. शहरात जास्तीत जास्त कोरोनाच्या टेस्ट करण्यावर अजित पवार यांचा जोर आहे.

नागरिकांचे विनाकारण मोठ्या प्रमाणात फिरणे होत होते. मास्क न घालता, फिजिकल डिस्टनसिंग न पाळता हे नागरिक इतर पुणेकरांचाही जीव धोक्यात टाकत होते.

त्यामुळे कोरोनाचे वाढते संकट आटोक्यात आणण्यासाठीच हा लॉकडाऊला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही धुमाळ यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.