Pune : ‘लॉकडाऊन माणूस आहे, माणुसकी लॉकडाऊन नाही’; सामाजिक कार्यकर्त्या रिता शेटिया यांची गरजू कुटुंबांना मदत

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना, कोरोनाच्या नियंत्रणासाठी लागू केलेल्या टाळेबंदीमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबांना दोन वेळच्या जेवणाची चिंता भेडसावत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या रिता शेटीया आणि ईश्वर बजाज यांनी माणूस लॉक डाऊन असला तरी माणुसकी नाही, असे म्हणत सिंहगड रोड, नऱ्हे आणि धायरी गाव येथील गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

सिंहगड पोलीस स्टेशन मधील पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके, सहायक पोलीस निरीक्षक उमरे, संदीप सांगळे, विष्णु कुमकर आणि दीपक शेंडे यांच्या सहकार्य आणि मार्गदर्शनातून एकूण 60 कुटुंबांना एक महिन्याचे राशन यामध्ये तांदूळ, तुर डाळ, तेल, मिरची पावडर, मीठ, पीठ देण्यात आले.

पद्मश्री लीला पूनावाला, फिरोझ पूनावाला आणि मित्र परिवार यांनी यासाठी आर्थिक मदत केली. नेहमीप्रमाणेच सामाजिक बांधिलकीमध्ये पूनावाला यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. या उपक्रमासाठी श्वेता बजाज, वैभवी राठी, अक्षय उर्डे, अजित भालेगावकर, संतोष, अझहर, धनंजय गोरे यांचे सहकार्य लाभले.

भक्कम आणि सशक्त राष्ट्रासाठी ‘स्पर्श टाळा पण मन जवळ आणा’. कोरोनाचा प्रादुर्भाव सगळीकडे वाढलेला असताना या लॉकडाऊनच्या काळात ज्यांचे दैनंदिन आयुष्य रोजच्या मोलमजुरीवर अवलंबून आहे, अशा गोरगरीब मजुर, इतर राज्यातील कामगार या कुटुंबांना दोन वेळच्या जेवणाची समस्या भेडसावत आहे.

माणूस लॉकडाऊन असला तरी माणुसकी लॉकडाऊन नाही, भुकेच्या वेळी तुम्ही दिलेल्या अन्नाचा एक घास, आज एखाद्याला जगवू शकतो. घराची दारे बंद असली, तरी मनाची दारे खुली करा. गरजूंना सढळ हाताने मदत करा. त्यांच्या पर्यंत अन्नधान्य पोहचवण्याची जबाबदारी आमची, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या रिता शेटीया यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.