Pune Lockdown: कोरोनाचे अपयश झाकण्यासाठी पुन्हा लॉकडाऊनची घोषणा- जगदीश मुळीक

Pune Lockdown: Lockdown announced again to cover Corona's failure - Jagdish Mulik

एमपीसी न्यूज – पहिल्या चार लॉकडाउनमुळे थांबलेले पुणे शहरातील जनजीवन पूर्वपदावर येत असताना आणि अर्थव्यवस्थेचे चक्र पुन्हा फिरत असताना सोमवारी मध्यरात्रीपासून (१३ जुलै) जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मोठे नुकसान होणार आहे. पुणेकरांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आणि असंतोषाची भावना असल्याची टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे.

जगदीश मुळीक म्हणाले, ‘वास्तविक लॉकडाउन हा कोरोना रोखण्याचा उपाय नाही. रुग्णालयांची क्षमता वाढविणे, बेडसची संख्या वाढविणे, ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची संख्या वाढविणे, पुरेशा प्रमाणात पीपीई किटची निर्मिती, मास्क आणि सॅनिटायझरची उपलब्धता आणि जनजागृतीसाठी पहिल्या चार टप्प्यांमध्ये प्रयत्न करण्यात आले. प्रदीर्घ लॉकडाऊननंतर राज्यात सर्वत्र निर्बंध शिथिल होत असताना, पुन्हा लॉकडाऊन सुरू झालेल्या रोजगार निर्मितीच्या प्रक्रियेला खीळ घालणारा निर्णय असून, हातावर पोट असणाऱ्या फार प्रमाणात मिळत असलेले रोजगाराचे साधन हिरावून घेतले जाणार आहे.’

‘लॉकडाउनच्या घोषणेमुळे व्यापाऱ्यांमध्ये विरोधाची भावना निर्माण झाली आहे. सुरू झालेली व्यवसायाची घडी पुन्हा नव्याने सुरू करण्याचे आव्हान आहे. व्यावसायिकांना मोठी आर्थिक झळ बसणार आहे. शेतमालाला उठाव नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. उद्योगांच्या आर्थिक अडचणीत वाढ होणार आहे. स्वस्त धान्य दुकानात धान्य वितरित करणे अशक्‍य होणार आहे. मध्यमवर्गीय आणि गरीबांची मोठी परवड होणार आहे. त्यामुळे समाजातील सर्वच घटकांचे मोठे नुकसान होणार आहे.’

मुंबई सारख्या शहराची परिस्थिती पुण्यापेक्षा अधिक गंभीर असताना, मुंबईत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला नाही. शासन आणि प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव असल्याने मनमानी पद्धतीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. चाचण्यांची संख्या वाढविणे, नागरिकांमध्ये सोशल सामाजिक अंतर, मास्कचा वापर बंधनकारक करणे, योग्यप्रकारे जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. कोरोनाला रोखण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. कोरोना नियंत्रित करताना आलेले अपयश लपविण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला असावा. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यात आलेले नाही. या निर्णयाला पुणे शहर भाजपचा विरोध आहे. परंतु, प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याची पक्षाची भूमिका आहे, असेही मुळीक यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.