Pune : रुग्ण संख्येच्या परिस्थितीनुसार लॉकडाऊनचे नियम शिथिल – मुख्यमंत्री

Lockdown rules relax according to patient numbers - CM : प्रतिबंधित क्षेत्रात नियमांची कडक अंमलबजावणी

एमपीसीन्यूज : व्हेंटिलेटर, पीपीई किट, एन 95 मास्कचा पुरवठा एक सप्टेंबरनंतरही केंद्राकडून करण्यात यावा, अशी विनंती पंतप्रधानांना केली आहे. सर्व लोकप्रतिनिधींनी देखील आपआपल्या स्तरावर याबाबत विनंती करावी, जेणेकरुन राज्याला याचा लाभ होईल. कोरोना रुग्ण संख्येच्या परिस्थितीनुसार लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात येत आहेत. तथापि, प्रतिबंधित क्षेत्रात नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

पुण्यातील विधान भवन सभागृहात   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील कोविड व्यवस्थापन व नियोजनाबाबत आज, गुरुवारी बैठक घेण्यात आली.  त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीला कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ व पिंपरी-चिंचवडच्या महापौर माई ढोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, खासदार सर्वश्री गिरीश बापट, श्रीरंग बारणे, वंदना चव्हाण, डॉ.अमोल कोल्हे, माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेले रुग्ण बऱ्याचदा रुग्णालयात जायला टाळाटाळ करतात. त्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आढळून येत आहे.

असे होवू नये यासाठी खाजगी प्रयोगशाळांनी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांना परस्पर तपासणी अहवाल न देता संबंधित महापालिका यंत्रणेला द्यावा, जेणेकरुन रुग्णांना वेळेत बेड उपलब्ध होईल.

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी कोरोना परिस्थिती नियंत्रणासाठी दर आठवड्याला पुण्यात प्रशासकीय यंत्रणेसोबत बैठका घेवून आढावा घेत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर आतापर्यंत पुण्यात राबविण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

भोर तालुक्यातील भूस्खलन होत असणाऱ्या गावांचे माळीणच्या धर्तीवर पुनर्वसन करण्याच्या दृष्टिने सविस्तर प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, अशा सूचना दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.