Pune : रस्ते रुंदीकरणाच्या प्रस्तावाविरोधात राज्य शासनाकडे तक्रार करणार : महाविकास आघाडीचा इशारा

Complaint lodged to State Government against road widening proposal- Signals Mahavikas Aghadi

एमपीसी न्यूज – भाजपने बहुमताच्या जोरावर 323 रस्ते रुंद करण्याचा प्रस्ताव चुकीच्या पध्दतीने मान्य केला. याला आमचा विरोध असून या विरोधात आम्ही राज्य शासनाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा काँग्रेस – राष्ट्रवादी – शिवसेनेतर्फे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आला.

यावेळी आमदार चेतन तुपे म्हणाले, पुणे शहराचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. सरसकट सर्वच रस्ते 9 मीटर होणार नाहीत.

भ्रष्टाचार डोळ्यांसमोर ठेवून रस्त्यांचा विषय मंजूर करण्यात आला आहे. याचा फायदा बांधकाम व्यवसायिकांनाच होणार आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 6 मीटरवर टीडीआर द्यायचा नाही, असा निर्णय घेण्यात आला. आता 210 ची पळवाट काढली. मग फडणवीस यांचा निर्णय चुकला होता हे त्यांना मान्य आहे का, असा सवालही आमदार तुपे यांनी उपस्थित केला.

स्मार्ट सिटीचेही असेच केले. यामध्ये शहरातील मध्यवर्ती भाग व 23 गावातील रस्ते घेतले नाही. भाजपच्या बालबुद्धी अध्यक्षांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर चुकीचे आरोप करू नये, असा टोलाही आमदार तुपे यांनी लगावला.

शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार म्हणले, या रस्त्यांच्या विषयाला आम्ही स्थायी समितीच्या बैठकीत विरोध केला. ‘सबका साथ फक्त काहींचाच विकास’, हे त्यांचे ब्रीद वाक्य झाल्याचा हल्लाबोल सुतार यांनी केला.

भाजपवाले महापालिका बुडवायला निघाले आहेत. 4 वर्षांत किती रस्ता रुंदीकरण केले. केवळ कागदावर रुंदीकरण करून उपयोग होणार नाही. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सत्ताधाऱ्यांचा विश्वास नाही का? असा सवाल करीत यामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सुतार यांनी केला.

तर, बाणेर – बालेवाडी, कोथरूड भागातील 323 रस्ते प्रस्तावात घेण्यात आले आहेत. जिथे दुकानदारी, तिथे हा विषय मंजूर केला. हा विषय पुणेकरांच्या हिताचा नाही, राज्य शासनाकडे याचा पाठपुरावा करू, असे काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे म्हणाले.

6 मीटरचे केवळ 323 रस्त्यांऐवजी सर्वच रस्ते 9 मीटर न करता करण्यात यावे. त्यासाठी महापालिकेने धोरण करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या होत्या. मात्र, त्यांच्या आदेशाकडे सत्ताधारी भाजपने लक्ष दिले नाही, अशा शब्दांत विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी नाराजी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.