Pune: ‘हॅलोआर्किया’मुळे ‘लोणार सरोवर झाले गुलाबी; ‘एआरआय’चा अहवाल

Pune: Lonar Sarovar turned pink due to Haloarchia '; ARI report जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे हिरव्या रंगाचे पाणी जूनच्या पहिल्या आठवड्यात एकाएकी गुलाबी झाल्यानंतर सर्व स्तरांतून आश्‍चर्य व्यक्‍त करण्यात आले होते.

एमपीसी न्यूज – जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे पाणी जूनच्या पहिल्या आठवड्यात अचानक गुलाबी झाले होते. अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिलेल्या या घटनेचे रहस्य उलगडले असून पाण्याचा रंग बदलण्यामागे पाण्यातील हॅलोअर्किया हा जीवाणू असल्याचे निष्पन्न झाले आहे.

पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेने (एआरआय) याबाबत विश्लेषण केले आहे. एआरआय’ने विश्लेषणाचा अहवाल नुकताच वन विभागाला पाठवला आहे.

जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे हिरव्या रंगाचे पाणी जूनच्या पहिल्या आठवड्यात एकाएकी गुलाबी झाल्यानंतर सर्व स्तरांतून आश्‍चर्य व्यक्‍त करण्यात आले होते.

हा परिणाम नैसर्गिक आहे की मानवनिर्मित याचे कारण शोधण्यासाठी वन विभागातर्फे पुण्यातील एआरआय आणि नागपूर येथील नीरी या संस्थेला पाण्याचे नमुने विश्लेषणासाठी देण्यात आले होते.

‘एआरआय’ने नुकताच त्या नमुन्यांच्या पाण्यातील हॅलोआर्किया जिवाणूच्या विश्लेषणाचा अहवाल वन विभागाला सादर केला. उन्हाळ्यात लोणार सरोवराच्या पाण्यातील हॅलोआर्किया जिवाणूंची संख्या एकाएकी वाढल्यामुळे सरोवराच्या पाण्याचा रंग गुलाबी झाला होता.

सूर्यप्रकाशाच्या साह्याने या जीवाणूंची चयापचय क्रिया सुरू असताना गुलाबी रंगद्रव्ये तयार होतात असे ‘एआरआय’चे संचालक डॉ. प्रशांत ढाकेफळकर म्हणाले.

लोणारच्या पाण्यात हे जीवाणू आधीपासून अस्तित्वात आहेत. मात्र, पूर्वमोसमी पावसाच्या अभावी यंदा उन्हाळ्यात सरोवराच्या पाण्याची क्षारता वाढली. त्यात लॉकडाउनमुळे कोणताही मानवी अडथळा नव्हता.

अशा स्थितीत हॅलोआर्कियाचे सरोवराच्या पृष्ठभागावरील प्रमाण वाढत गेले आणि सरोवर काही काळासाठी गुलाबी झाले होते, असे या अहवालात म्हटले आहे.

दरम्यान, लोणारमध्ये अभ्यासकांनी नुकत्याच केलेल्या पाहणीतून सरोवराचा रंग पुन्हा हिरवा झाल्याचे दिसत आहे. जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या अभ्यासकांनी ‘एआरआय’ला नुकत्याच दिलेल्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये पुन्हा लोणारचे वैशिष्ट्य असणाऱ्या शैवालांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.