Pune-Lonavala Local : लोकल प्रवाशांनो इकडे लक्ष द्या; ……तर आणि तरच महिन्याभराचा पास मिळेल

रेल्वेचा नियम अन पोलिसांच्या उदासीनतेमुळे प्रवाशांची हेळसांड,

एमपीसी न्यूज – एक डिसेंबर रोजी प्रवाशांकडे पूर्ण महिन्याचा व्हॅलीड क्यूआर कोड नसेल तर त्यांना लोकल प्रवासाचा महिन्याभराचा पास मिळणार नाही. दोन डिसेंबरला जरी क्यूआर कोड काढला तरीही पास मिळणार नसून प्रवाशांना महिनाभर दररोज क्यूआर कोड दाखवून तिकीटच काढावे लागणार आहे. असा रेल्वे प्रशासनाने नियम लागू केला आहे. पोलिसांकडे क्यूआर कोड अपडेट करण्यासाठी ऑनलाइन माध्यमातून पाठवल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यावर पोलिसांकडून प्रतिसाद दिला जातो. रेल्वेचे नियम आणि पोलिसांच्या उदासीन धोरणात प्रवाशांची मात्र चांगलीच हेळसांड होत आहे.

अत्यावश्यक सेवेतील नागरिकांसाठी प्रशासनाने पुणे-लोणावळा लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सकाळी आणि संध्याकाळी लोकल सुरूही करण्यात आली. अनेकांनी लोकलच्या वेळेनुसार आपले वेळापत्रकही तयार केले. मात्र रेल्वे आणि पोलिसांच्या अजब धोरणांमुळे प्रवासी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

पुणे-लोणावळा लोकल सुरू करण्यासाठी पुण्याच्या पोलीस आयुक्तांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. नोडल अधिकाऱ्यांनी लोकल रेल्वेने प्रवास करायचा असेल तर त्यासाठी प्रवाशांना पोलिसांकडून क्यूआर कोड आधारित ओळखपत्र घ्यावे लागेल, हा नियम घालण्यात आला. अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांनी पोलिसांच्या वेबसाईटवर जाऊन सर्व माहिती भरायची त्यानंतर संबंधित व्यक्तीला प्रवासाची परवानगी द्यायची अथवा नाही हे ठरवले जाते. क्यूआर कोड आधारित मंजुरी, नामंजूरी मिळण्यासाठी किमान एक दिवसाचा कालावधी लागतो.

12 ऑक्टोबर पासून लोकल रेल्वे सुरू करण्यात आली आहे. पुणे-लोणावळा लोहमार्गाच्या परिसरात वास्तव्यास असलेल्या अनेक अत्यावश्यक सेवेतील नागरिकांची यामुळे सोय झाली. असे असले तरी रेल्वेने आता नवीन नियम सुरू केला आहे. महिन्याच्या पहिल्या तारखेला जर प्रवाशांकडे संपूर्ण महिन्याचा क्यूआर कोड असेल तरच महिन्याभराचा पास दिला जाईल. दोन तारखेला जरी पास मागण्यासाठी प्रवासी आले तरीही पास मिळणार नाही.

एक तारखेला क्युआर कोड काढला नाही तर प्रवाशांना महिनाभर दररोज तिकीट घ्यावे लागणार आहे. तिकीट घेताना दररोज क्यूआर कोड दाखवावा लागणार आहे. क्यूआर कोड दाखविण्यासाठी नागरिकांची ना नाही. मात्र अनेक वेळेला नेटवर्कच्या अडचणी असतात. त्यात क्यूआर कोड स्कॅन होत नाही. त्यामुळेही नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

पुणे लोणावळा लोकलचे नियमित प्रवासी मनोज शिंदे म्हणाले, “केवळ चालू महिन्यापुरताच क्यूआर कोड मिळतो. पोलिसांनी पुढील महिन्याचा देखील क्यूआर कोड द्यायला हवा. क्यूआर कोड अपडेट करताना तीच प्रक्रिया करावी लागते. काहीही बदल होत नाही. मग प्रवाशांचा वेळ विनाकारण का वाया घालवला जातो, हेच कळत नाही. लॉकडाऊन संपले आणि क्यूआर कोड प्रवाशांकडे असला तर त्याचा गैरवापर होणार नाही. तसेच लॉकडाऊन वाढले आणि लोकल रेल्वे बंद झाली तरीही क्यूआर कोड दिल्याचा प्रशासनाला आणि प्रवाशांना काहीच तोटा नाही. केवळ प्रवाशांची हेळसांड करून त्यांचा वेळ वाया घालवला जात आहे. पोलिसांनी सिस्टीम अपडेट करण्याची गरज आहे.”

नाव न देण्याच्या अटीवर रेल्वेच्या एका अधिका-याने सांगितले की, रेल्वेने नवीन नियम सुरु केला आहे. एक तारखेला प्रवाशांकडे संपूर्ण महिन्याचा क्यूआर कोड असेल तरच त्यांना महिन्याभराचा पास द्या. अन्यथा दररोज तिकीट द्या. यामुळे आमचेही काम वाढणार आहे. प्रत्येकाला तिकीट देताना क्यूआर कोड स्कॅन करून खातरजमा करून तिकीट द्यावे लागते. यात आमचा आणि प्रवाशांचा देखील वेळ वाया जात आहे. या प्रक्रियेमुळे अनेकांची लोकल सुटल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. पण आम्ही नियमाने बांधलो गेलो असल्याने काहीच करता येत नाही. क्यूआर कोड एकदा दिला तरीही काम होण्यासारखे आहे. वेळोवेळी अपडेट केल्याने त्यात काहीही बदल होत नाही.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.