Pune Crime News : ‘ते’ दुहेरी हत्याकांड सुडाच्या भावनेतून; खून करणाऱ्या बापलेकासह तिघांना अटक

एमपीसी न्यूज –  पुण्याच्या लोणीकंद पोलिस स्टेशनच्या हद्दीत बुधवारी सायंकाळी दुहेरी खुनाची घटना घडली होती. गोल्डन मॅन सचिन शिंदे खून प्रकरणातील आरोपी सनी शिंदे आणि मुलाला वाचवण्यासाठी मध्ये पडणाऱ्या कुमार शिंदे यांचा दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने कोयत्याने वार करून खून केला होता. या घटनेने संपूर्ण पुणे शहरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी महत्त्वपूर्ण धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून खून करणाऱ्या बापलेकासह तिघांना अटक केली आहे. तर दहा ते पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

नानासाहेब बाबुराव शिंदे आणि अशितोष नानासाहेब शिंदे अशी अटक करण्यात आलेल्या बाप लेकाची नावे आहेत. गोल्डमॅन सचिन शिंदे हा नानासाहेब शिंदे यांचा मुलगा होता. काही महिन्यांपूर्वी गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली होती. मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी नानासाहेब शिंदे आणि आशुतोष शिंदे यांनी इतर आरोपींच्या मदतीने सनी शिंदेंच्या खुनाचा कट रचला.

मागील वर्षी गोळ्या झाडून सचिन शिंदेचा खून करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी सनी शिंदे सह तिघांना अटक केली होती. तीन महिन्यांपूर्वी जामीन मिळाल्याने सनी शिंदे हा तुरुंगातून बाहेर आला होता. बुधवारी सायंकाळी तो वडिलांसह लोणीकंद परिसरातून चारचाकी गाडीने जात असताना पाच ते सहा जणांनी त्यांना अडवले. त्यानंतर दगड, कोयता आणि लाकडी स्टिकने मारहाण केली. मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून वडील कुमार शिंदे हे त्याला वाचवण्यासाठी मध्ये पडले. आरोपींनी त्यांच्यावर देखील वार केले. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर जागेवरच दोघांचा मृत्यू झाला.

लोणीकंद पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत पंधरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील दहा जणांची ओळख पटली असून तिघांना अटक केली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस या प्रकरणातील उर्वरित आरोपीचा शोध घेत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.