Pune : लॉयला प्रशालेने साकारले फुटबॉल मैदान

अत्याधुनिक सुविधा असणारे मैदान असणारी शहरातील पहिली शाळा; शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार

मैदानावर पहिले पाऊल भारतीय कर्णधार सुनील छेत्रीचे, उदघाटनासाठी छेत्रीसह गुरप्रीतसिंग संधू, उदांता सिंगची उपस्थिती

एमपीसी न्यूज- शालेय क्रीडा जगतात आपला ठसा निर्विवादपणे उमटविणाऱ्या लॉयला प्रशालेने “फिफा’ने प्रमाणित केलेल्या नैसर्गिक हिरवळीचे फुटबॉल मैदान विकसित करून आपल्या शालेय क्रीडा कारकिर्दीच्या इतिहासात नवा अध्याय जोडला. या आंतरराष्ट्रीय दर्जा असलेल्या या मैदानाचे गुरुवारी उदघाटन झाले. त्यामुळे नव्या फुटबॉल पिढीच्या क्रीडा विचारसरणीची व्याख्या नव्याने लिहिली गेली.

याचवर्षी फेब्रुवारी मध्ये आपल्या फुटबॉल खेळाडूंसाठी असे एखादे मैदान असावे असा विचार पुढे आला आणि लॉयलाच्या माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेने म्हणजेच लॉयला अॅल्युमनी नेटवर्कच्या (ईएलएएन) माध्यमातून हा विचार तडीस नेण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष मनोज वाळवेकर यांनी या सगळ्या योजनेत पुढाकार घेतला. हा विचार प्रत्यक्षात उतरविण्यासाठी 1962 नंतर या शाळेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांना सहभागी करून घेण्यात आले.

माजी विद्यार्थ्यांचा हा विचार पूर्णत्वाला नेण्यासाठी माजी प्राचार्य फादर नेल्टन थॉमस आणि उद्योगपती अतुल किर्लोस्कर यांच्या अध्यक्षतेखाली आठ जणांची लॉयला स्पोर्टस व्हिजन (एसएलव्ही) अशी समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून मग एक आंतरराष्ट्रीय दर्जा असलेले नैसर्गिक हिरवळीचे मैदान तयार झाले. पाण्याची स्वयंचलित यंत्रणा, सहजपणे पाण्याचा निचरा होणारी (ड्रेनेज सिस्टिम) रचना असणारे चार इंच वाळूचा थर असणारे अशा प्रकारचे मैदान शहरात प्रथमच तयार करण्याचा मान लॉयला प्रशालेने मिळविला.

या सगळ्या योजनेबद्दल किर्लोस्कर म्हणाले,”क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना उत्कृष्ट काम करण्यास मदत करण्यासाठी उत्तम सुविधा आणि संधी देणे महत्वाचे आहे. याच उद्दिष्टाने आम्ही ही कल्पना मांडली आणि ती साकार केली.”

मैदान तयार करताना आपल्या मुलांना वर्षभर कसे खेळता येईल आणि दुखापतही होणार नाही याचा विचारही करण्यात आला आहे. त्यामुळेच आधी वाळूचा थर करून त्यावर हिरवळ निर्माण करण्यात आली. त्यामुळे मैदानाला एक प्रकारचा मऊपणा आला. त्यामुळे या मैदानावर मुले बिनधास्तपणे फुटबॉलचा आनंद घेऊ शकतील आणि पडल्यावरही मोठी दुखापत होण्याचा धोकाही संभवत नाही. हेच या मैदानाचे वैशिष्ट्य म्हणता येईल.

लॉयला प्रशालेचे प्राचार्य फादर अनीश म्हणाले,”आमच्या माजी विद्यार्थ्यांनी खेळासाठी वेगळा वेळ द्यावा यासाठी प्रयत्न केले. या प्रयत्नांसाठी ते नक्कीच कौतुकास प्राप्त आहेत. लॉयला ही देशातील अशी एक शाळा आहे की जेथे माजी विद्यार्थी कुठल्याही बळाशिवाय अशा मोठ्या प्रकल्पासाठी पुढे येतात. त्यांची ही परिवर्तन घडवून आणण्याची चळवळ त्यांचे संस्थेवर किती प्रेम आहे हे दाखवून देते. अत्याधुनिक दर्जाचे फुटबॉल मैदान सज्ज करण्यासाठी वृद्धांपासून तरुणांपर्यंत अनेक माजी विद्यार्थी एकत्र आले. त्यांची ही एकी विलक्षण आहे.”

ईएलएन आणि एलएसव्ही समितीला ही योजना यशस्वी करण्यासाठी पूना जेसुइट सोसायटीचे कार्याध्यक्ष फादर अॅण्ड्रयू फर्नांडिस यांच्याकडून प्रोत्साहन आणि पाठिंबा मिळाला. फादर अॅण्ड्रयू म्हणाले, “हे नवे फुटबॉल मैदान विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि माजी विद्यार्थ्यांसाठी अभिमान वाटावी अशीच उपलब्धी आहे.”

स्पोर्टस टर्फ आणि गोल्फ एंटरप्राजयजेस या कृत्रिम मैदाने करणाऱ्या कंपनीचे संस्थापक अमित मल्होत्रा यांच्या सहकार्यामुळे फुटबॉल मैदान इतक्या झटपट साकारण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले. मल्होत्रा यांना देशातील अशा प्रकारची मैदाने तयार करण्याचा अनुभव असून ते या मैदानांचे सल्लागार देखील आहेत. त्यांनी तयार केलेल्या मैदानांपैकी काही मैदानांचा वापर हा भारतात झालेल्या १७ वर्षांखालील विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत करण्यात आला होता.

या मैदानाची देखभाल करण्यासाठी कुठलीही कसर सोडली जाणार नाही. अतिशय काळजीपूर्वक या मैदानाची देखभाल ठेवली जाईल. यासाठी नैसर्गिकरित्या मिळणाऱ्या पाण्याचा उपयोग केला जाईल. सध्या शाळेच्या आवारात चार बोअरवेल असून, अनेक खड्डे करण्यात आले असून, त्यात पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढू शकेल. पाणी पुन्हा पुन्हा वापरण्यात यावे यासाठी माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात पाण्यावर पुर्नप्रक्रिया करणारे स्वतंत्र तीन सीवेज ट्रिटमेंट प्लांटस (एसटीपी) बसवले आहेत. यामुळे मैदानाला वर्षभर सहजपणे पाणी उपलब्ध होऊ शकेल.

शाळेच्या अशा या वैशिष्ट्यपूर्ण फुटबॉल मैदानाच्या उदघाटनही खास ठरले. आयएसएलमधील बंगळूर एफसी संघाचे तीन आंतरराष्ट्रीय खेळाडू भारतीय फुटबॉलचा पोस्टर बॉय कर्णधार सुनील छेत्री, गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधू आणि उगवता तारा उदांता सिंग हे उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना पायाभूत क्रीडा सुविधा देण्यासाठी लॉयला प्रशाला कटिबद्ध असून, याची पुढील पायरी म्हणजे प्रशालेत अॅथलेटिक्सचा सिंथेटिक ट्रॅक तयार करण्यात येणार आहे. याचे काम पुढील वर्षी जानेवारी महिन्यात सुरू होईल आणि वर्षभरात ते पूर्ण केले जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.