Pune : जादूगार चंद्रशेखर चौधरी यांच्या पंचाहत्तरी निमित्त देशभरातील 75 जादुगारांच्या हस्ते सत्कार

एमपीसी न्यूज – पुण्यातील ज्येष्ठ जादूगार चंद्रशेखर चौधरी यांच्या पंचाहत्तरी निमित्त देशाबाहेरील आणि देशभरातील 75 जादुगारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम सोमवारी (दि. 21) पीवायसी जिमखाना येथे झाला. यावेळी 75 जादूगारांच्या जादूचा आविष्कार दाखविण्यात आला. 75 जादूगारांमध्ये परदेशातील 4 जादूगारांचा समावेश होता.

‘सोसायटी ऑफ इंडियन मॅजिशियन्स ‘ या संस्थेने या जीवनगौरव सोहळ्यासाठी पुढाकार घेतला. ‘सोसायटी ऑफ इंडियन मॅजिशियन्स ‘चे अध्यक्ष भूपेश दवे ( मुंबई ), पीवायसी क्लबचे अध्यक्ष डॉ. एस.जी. भाटे यांच्या हस्ते चंद्रशेखर चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. क्लबचे सचिव आनंद परांजपे, विजय भावे, पदाधिकारी उपस्थित होते. प्रेक्षकात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर पुणेकर उपस्थित होते. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनीही जादूच्या प्रयोगात सहभागी होऊन आनंद लुटला.

लिऑन्स ( ऑस्ट्रेलिया ),कुमार कलातील ( केरळ), प्रेमानंद ( गोवा ),रजत, दीपक पांडे, सतीश चोप्रा ( दिल्ली ), जितेंद्र रघुवीर ( पुणे ) , अली ( हैदराबाद ), सुरेश राजपूत यांनी अनेक गंमती जादूतून दाखवल्या. पीवायसी जिमखानाचे अध्यक्ष डॉ. एस.जी. भाटे म्हणाले, ” चंद्रशेखर चौधरी यांनी वयाला मागे टाकले, ही जादूच आहे. जादूगार आपल्याला फसवत हसवत मनोरंजन करतात. आपल्यातील लपलेल्या छोट्या मुलाला जागे करतात, ही मोठी गोष्टी आहे. ”

1961  साली पुण्यात जादूचा पहिला प्रयोग करणाऱ्या चंद्रशेखर चौधरी यांनी देशभरात, देशाबाहेर हजारो जादूचे प्रयोग केले. बल्ब निर्मिती करणारे उद्योजक असतानाही चौधरी यांनी जादूगार म्हणून यशस्वी कारकीर्द केली. इंटरनॅशनल मॅजिक स्टार, लाईफटाईम अचिव्हमेंट अॅवार्ड असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. मॅजिशियन्स असोसिएशन पुणे या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा सहभाग होता. जादूगारांची पुण्यात अधिवेशने आयोजित करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता.त्यांच्या या क्षेत्रातील योगदानाचा सन्मान या कार्यक्रमात केला गेला. चंद्रशेखर चौधरी यांनी छोटेखानी मनोगतातून सत्काराला उत्तर दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.