Pune : महाराष्ट्र राज्य गड किल्ले संवर्धनासाठी विकास महामंडळ स्थापन करावे -सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेची सरकारकडे मागणी

एमपीसी न्यूज – महाविकास आघाडी सरकारने छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या गड किल्ले संवर्धनासाठी महाराष्ट्र राज्य गड किल्ले संवर्धन आणि विकास महामंडळ मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करावे आणि शिवनेरीवरील अंबरखाना इमारतीमधील सातवाहन आणि शिवकालीन वारसा संग्रहालयाला तातडीने मान्यता द्यावी, अशी मागणी सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेने सरकारकडे केली आहे. याबाबतचे पत्र संस्थेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.

संस्थेचे अध्यक्ष संजय खत्री म्हणाले, राज्य शासनाच्या विविध विभागांच्या समन्वयातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्याचा विकासासाठी सुमारे 86 कोटी रुपयांचा संवर्धन आणि विकास प्रकल्प २००२ पासून सुरू आहे. या प्रकल्पामुळे शिवनेरी किल्ल्याला मुर्तरुप आले आहे.आमच्या मागणीच्या संकल्पनेवर राज्य शासनाने रायगड विकास प्राधिकरण स्थापन केले आहे. मात्र, हे प्राधिकरण केवळ रायगडसाठी असून या प्राधिकरणाचा विस्तार करून त्याला महामंडळाचे स्वरूप द्यावे, अशी मागणीही आमच्यासह माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे, असेही त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर शिवनेरीवर येणार असल्याचे जाहिर केले आहे. त्यानुसार महामंडळ स्थापनेची घोषणा करावी, अशी आमची आग्रही मागणी आहे. तर,शिवनेरी किल्ल्यावर दरवर्षी सुमारे 5 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी, पर्यटक, शिवभक्त, संशोधक भेटी देत असतात. त्यांना माहिती देण्यासाठी कोणतीही सुविधा नसल्याने किल्ल्यावरील अंबरखाना इमारतीमध्ये सातवाहन आणि शिवकालीन वारसा संग्रहालयाची मागणी देखील आम्ही 2008 पासून करीत आहोत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.