Pune : महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेला पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक पसंती

एमपीसी न्यूज – पश्चिम महाराष्ट्रातील (Pune) पर्यावरणस्नेही 1 लाख 94 हजार 898 वीजग्राहकांनी छापील कागदाचा पूर्णपणे वापर बंद करीत पेपरलेस वीजबिलास राज्यात सर्वाधिक पसंती दिली आहे. यासाठी महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी झाल्याने या ग्राहकांना वार्षिक 2 कोटी 33 लाख 87 हजार 760 रुपयांचा फायदा होत आहे.

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेनुसार छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास प्रतिबिल व प्रतिमहिना 10 रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक 120 रुपयांची बचत होत आहे. त्यानुसार वीजबिलांसाठी छापील कागदाचा पूर्णपणे वापर बंद करीत पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल 1 लाख 94 हजार 898 पर्यावरणस्नेही वीजग्राहकांनी केवळ ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडला आहे. या योजनेत आतापर्यंत राज्यातील 4 लाख 87 हजार 113 वीजग्राहकांनी सहभाग घेतला आहे. त्यामध्ये सर्वाधिक 40 टक्के ग्राहक पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. तर पुणे परिमंडलातील 1 लाख 30 हजार 761 ग्राहक राज्यात सर्वाधिक संख्येने या योजनेत सहभागी झाले आहेत.

आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत ‘गो-ग्रीन’ योजना पर्यावरण रक्षणासाठी देखील महत्वाची आहे. कागदी वीजबिलांचा वापर बंद केला तरी महावितरण मोबाईल अॅप व वेबसाईटवर ग्राहकांसाठी चालू व मागील वीजबिल तसेच वीजबिल भरण्याच्या पावत्या आदींची माहिती उपलब्ध आहे. वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच संगणकीय प्रणालीद्वारे ते ‘गो-ग्रीन’मधील ग्राहकांना ‘ई-मेल’द्वारे पाठविण्यात येत आहे. सोबतच ‘एसएमएस’द्वारे देखील वीजबिलाची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे प्रॉम्ट पेमेंटसह ऑनलाइनद्वारे लगेचच बिल भरणा करणे आणखी सोपे झाले आहे. सर्व लघुदाब ग्राहकांनी ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांनी केले आहे.

पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये पुणे जिल्ह्यातील 1 लाख 39 हजार 822 ग्राहक सहभागी झाले आहेत. त्यांची 1 कोटी 67 लाख 78 हजार 640 रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे. तर, या योजनेतून सातारा जिल्ह्यातील 12 हजार 796 ग्राहकांचे 15 लाख 35 हजार 520 रुपये, सोलापूर जिल्ह्यातील 13 हजार 819 ग्राहकांचे 16 लाख 58 हजार 280 रुपये, कोल्हापूर जिल्ह्यातील 17 हजार 515 ग्राहकांचे 21 लाख 1 हजार 800 रुपये आणि सांगली जिल्ह्यातील 10 हजार 946 ग्राहकांच्या 13 लाख 13 हजार 520 रुपयांचा वीजबिलामध्ये वार्षिक फायदा होत आहे.

‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी झालेल्या वीजग्राहकांना छापील (Pune) वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ईमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच संकेतस्थळावर चालू वीजबिलासह मागील 11 महिन्यांचे वीजबिले मूळ स्वरुपात उपलब्ध आहेत. आवश्यकतेप्रमाणे वीजग्राहकांना ते कधीही डाऊनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट करण्याची सोय आहे. वीजग्राहकांनी ‘गो-ग्रीन’ योजनेचा पर्याय निवडण्यासाठी महावितरणचे मोबाईल अ‍ॅप किंवा www.mahadiscom.in संकेतस्थळ येथे सुविधा उपलब्ध आहे.

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share