Pune : माहेश्वरी समाजाच्या धनुर्मास उत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद

मकरसंक्रातीला 15 जानेवारी रोजी उत्सवाची सांगता

एमपीसी न्यूज- माहेश्वरी समाजाच्या वतीने आयोजित धनुर्मास उत्सवाला दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. उत्सवास दिनांक १७ डिसेंबरपासून प्रारंभ झाला असून, आज, मकरसंक्रांत दिनी सांगता होणार आहे, अशी माहिती माहेश्वरी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते भगीरथ राठी यांनी पत्रकाद्वारे दिली.

महिनाभर सुरु असलेला हा उत्सव श्री बालाजी मंदिर ट्रस्ट, नारायण पेठ येथे होत आहे. यामध्ये माहेश्वरी समाजातील पुरुष, महिला भक्तगण, सभासद, मान्यवर मोठ्या संख्येने सहभाग घेत आहेत. उत्सवाच्या ३० व्या दिवशी मकरसंक्रांतीला रंगनाथ देव आणि श्रीगोंदबाजी यांच्या विवाह महोत्सवाने उत्सवाची सांगता होते.

गेले महिनाभर सुरु असलेल्या या उत्सवात प्रभात फेरी, अनुष्ठान, भजन, कीर्तन याचा समावेश आहे. तुळशीपत्र, सुंठ, खीर (दूध, तांदूळ आणि साखर मिश्रित), खिचडी, फुलोरा आदी पदार्थांचे या मासात प्रसाद स्वरूपात सेवन करतात. गोदा, गीतावली, वेदपाठ, अर्चनावली अशा धार्मिक ग्रंथांचे पठण केले जाते.

या उत्सवाबाबत माहिती देताना राठी म्हणाले, ‘या उत्सवाला श्रीगोदंबाजी उत्सवाने देखील ओळखले जाते. या धनुर्मास उत्सवात रंगनाथ देव आणि श्रीगोदंबाजी यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य जेव्हा धनु राशीत प्रवेश करतो त्या महिन्याला ‘धनुर्मास’ म्हणतात. माहेश्वरी समाजाच्या सर्व मठात, मंदिरात श्रद्धेने हा उत्सव साजरा होतो’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.