Pune : महिला मुक्ती परिषदेत सावित्रीच्या 11 लेकींचा सन्मान

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला मुक्ती परिषद

एमपीसी न्यूज- सत्यशोधक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताद्वी महोत्सव समिती व झाशीची राणी प्रतिष्ठान ट्रस्टतर्फे स्त्री शिक्षणाच्या जनक ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (दि. 3) जानेवारी रोजी महिला मुक्ती परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. 11 सामाजिक कार्यकर्त्या महिलांना सम्यक गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

अंकल (यादवराव) सोनवणे ,वसंतराव साळवे यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. शारदा वाडेकर होत्या.
प्रमुख पाहुणे म्हणून रमेश राक्षे, जांबुवंत मनोहर, मिलिंद अहिरे, अॅड. किरण कदम, दिलीपसिंग विश्वकर्मा, सचिव बगाडे उपस्थित होते.

सामाजिक क्षेत्रातील सुनीती सु.र., लता राजगुरु ,अॅड. नीलिमा वर्तक, सुमन मोरे, सुमन गायकवाड , कावेरी जाधव, नीता अडसुळे, मोहिनी कारंडे, मनीषा जाधव, रुक्साना शेख, रेखा चौरे यांना सम्यक गौरव पुरस्कार देण्यात आले.

सुनिती सु. र. म्हणाल्या, “सावित्रीबाईंनी समतेच्या दिशेने पुढे जाण्याची ताकद दिली. ‘स्वतः पलीकडे जाऊन समाजाचा विचार महिला करतात, आणि समाजकार्यात योगदान देतात, हे महत्वाचे आहे”

नीलिमा वर्तक म्हणाल्या, “संविधानाची ताक द असताना महिलांनी विषमता विरोधात लढा दिला नाही तर ते दुर्दैव ठरेल”

अध्यक्ष स्थानावरून बोलताना अॅड. शारदा वाडेकर म्हणाल्या, “सध्याच्या परिस्थितीत आव्हाने वाढत आहेत.आंदोलनात्मक कामात महिला,युवती हिरीरीने सहभागी होत आहेत, ही आशादायक बाब आहे. स्त्रियांचा सन्मान करण्याची पद्धत समाजात येत आहे ही देखील चांगली गोष्ट आहे. दुसरीकडे स्त्रियांवरील अत्याचार वाढत आहेत, ही चिंतेची बाब असून समाजाने त्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. आया बहिणीवर आधारित शिव्या देणे थांबविण्याची शपथ सावित्रीबाईंच्या जयंती दिनी घेतली पाहिजे. राजकारणातील महिलांना कळसूत्री बाहुल्या प्रमाणे वागवणे सोडले पाहिजे. महिला प्रगती करीत असताना त्यांना कमी लेखण्याची मानसिकता गाडली पाहिजे. स्त्रियांना सन्मान देण्याची सुरुवात घरापासून केली पाहिजे”

माजी नगरसेविका, झाशीची राणी प्रतिष्ठान ट्रस्टच्या संस्थापक अॅड. रूपाली पाटील-ठोंबरे यांनी स्वागताध्यक्ष या नात्याने प्रास्ताविक केले. सत्यशोधक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव समितीतर्फे संयोजक नागेश भारत भोसले यांनी स्वागत केले. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. वैशाली पाटील यांनी आभार मानले.

परिषद यशस्वी करण्यासाठी संयोजन समिती सदस्य आनंद वैराट, दिपक (आण्णा) गायकवाड ,संतोष (आबा) सुरते, मनीषा कावेडीया, अमोल (सोनू) काशिद, पुरुषोत्तम नांगरे, सचिन साठे ,भागवत कांबळे, सचिन भालशंकर यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.