Pune : परदेशातून परतलेल्या व्यक्तींना विलगीकरण कक्ष राहणे अनिवार्य करा

महापौर मुरलीधर मोहोळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज – ‘पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १८ वर पोहचली असून त्यातील बहुतांश रुग्णांना ते परदेशातून भारतात आल्याची पार्श्वभूमी आहे. आपण परदेशातून परतणाऱ्या नागरिकांना त्यांच्याच घरात विलगीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु, मुंबई आणि पुणे विमानतळावर येणारे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणारे हे नागरिक स्थानिकांच्या संपर्कात येत आहेत.

पुण्यातील घटनांमध्ये हे प्रकर्षाने जाणवले असून त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे घरी विलगीकरण करण्याऐवजी विलगीकरण कक्षात राहणे अनिवार्य करावे, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

परदेशातून परतलेले नागरिक कोरोनाबाधित असतील तर जाताना ते कॅबचालक, त्यांचे नातेवाईक आणि इतर स्थानिकांच्या संपर्कात येत असून त्यामुळे कोरोनाचा फैलाव वाढण्याचा धोका आहे.

महापौर मोहोळ म्हणाले, ‘घरात विलगीकरण कक्षात राहण्याचे आदेश दिले असले, तरी नागरिकांकडून त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे परदेशातून येणाऱ्या नागरिकांना मुंबई व पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळच्या उपलब्ध इमारतीत क्वारंटाईन करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला सूचना देऊन बंधनकारक केल्यास इतर नागरिकांना याचा प्रादुर्भाव होण्याचा धोका कमी होण्यास मदत होईल आणि मुंबई व पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळपास याची सोय उपलब्ध झाल्यास कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक प्रभावीपणे रोखता येईल.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.