Pune : शहरातील सर्व हॉस्पिटलमधील काही बेड्स कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करा : पृथ्वीराज सुतार

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील सर्व हॉस्पिटलमधील काही बेड्स कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करून द्या, अशी मागणी शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना देण्यात आले आहे.

पुणे शहरासह जगभरात कोरोनाचे संकट आहे. पुण्यात कोरोनामुळे 150 च्या आसपास मृत्यू झाले आहेत. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी मनपा पॅरोलवरील हॉस्पिटल, कराराने चालविण्यास दिलेले, विविध सवलतीच्या माध्यमातून, जागेच्या माध्यमातून दिलेले हॉस्पिटल, या सर्व हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या रुग्णांसाठी काही बेड्स संपूर्ण सोयीसुविधांसाह आपत्तीजनक परिस्थितीच्या नियमानुसार ताब्यात घ्याव्यात.

संबंधित डॉक्टर्स, नर्सेस व प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती करावी. त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार करणे शक्य होणार आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार असल्याचेही पृथ्वीराज सुतार यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

शिवसेना मदतीला तयार

पुणे शहरात ज्या भागांत, वस्तीमध्ये आणि वसाहतीमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशा ठिकाणी जर स्वयंसेवक, मदतनीस म्हणून आवश्यकता असेल तर शिवसेनेचे कार्यकर्ते तयार असल्याचे पृथ्वीराज सुतार यांनी सांगितले. त्यासंदर्भातील पत्र महापौर मुरलीधर मोहोळ यांना देण्यात आले आहे. पुणे शहरात निर्माण झालेले कोरोनाचे संकट कमी करण्यासाठी केंद्र, राज्य आणि पुणे मनपा प्रशासन चांगले काम करीत असल्याचेही ते म्हणाले.

पुणे मनपा प्रशासन, आरोग्य विभाग, इतर विभागातील अधिकारी – कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस, स्वच्छता कर्मचारी, आपल्या जीवावर उद्धार होऊन काम करीत आहेत. त्यांचे मनःपूर्वक आभार आणि धन्यवादही पत्रातून मानण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.