Pune : ‘ग्रहण ‘ मालिकेनंतर आता ‘पार्टी ‘ चित्रपटात मंजिरी पुपाला येतेय रसिकांसमोर

एमपीसी न्यूज- झी मराठीच्या ‘ग्रहण‘या मालिकेतील ‘प्रियांका’ या रोलमध्ये आतापर्यंत आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलेल्या मंजिरी पुपालाने या मालिकेबरोबरच आपला सगळ्यांचा निरोप घेत असला तरीही आता लवकरच ‘पार्टी‘ या सिनेमातून ती मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. हा तिचा मराठीतील पहिलाच चित्रपट असून, येत्या आठवड्यात या फिल्मचा पहिला टीजर आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळेल.

येत्या 24 ऑगस्टला येऊ घातलेल्या या सिनेमात तिच्याबरोबर युव्रत जोशी, अक्षय टांकसाळे, स्तवन शिंदे, प्राजक्ता माळी आणि रोहित हळदीकर असे आघाडीचे युवा कलाकार आहेत.

सचिन दरेकर दिग्दर्शित या ‘पार्टी‘त मंजिरी ‘दीपाली‘ची भूमिका साकारणार असून, मैत्रीच्या धम्माल नात्यावर हा सिनेमा आधारित असल्याचे तिने सांगितले.

ग्रहण या मालिकेविषयी विचारल्यावर ती म्हणाली, ‘या मालिकेचे माझ्या मनात एक विशेष स्थान आहे. कारण प्रियांका या भूमिकेला भरभरून मिळालेलं प्रेम आणि प्रतिसाद. विशेषतः सोशल मीडियाद्वारे आलेले प्रेक्षकांचे मेसेजेस माझ्यासाठी खूप स्पेशल आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभरातून माझ्या कामाकडे प्रेक्षक इतक्या बारकाईने बघत आहेत या जाणीवेने आपल्या कामाविषयीची जबाबदारी वाढल्यासारखी वाटली. माझ्या आईने नियमितपणे या मालिकेचे सगळे एपिसोड बघितले याचे विशेष समाधान ‘ग्रहण‘ ने मला दिलं !

‘आतापर्यत केलेल्या कामांपैकी ‘ग्रहण‘ एक अत्यंत विशेष अनुभव होता. या शोसाठी काम करताना मला खूप चांगल्या टीमबरोबर काम करायची संधी मिळाली. एका बाजूला पल्लवी जोशींसारख्या प्रतिभावान, अनुभवी आणि प्रेमळ अभिनेत्रीबरोबर काम करण्याचा आनंद मिळाला. खूप खूप शिकायला मिळालं, तर दुसरीकडे योगेश देशपांडेंसारख्या गुणी अभिनेत्याबरोबर काम करताना मजाही आली. शूटिंगच्या दिवसांपासून वर्षा घाटपांडे, निरज गोस्वामी, आम्ही सगळेच एका कुटुंबासारखे होतो.‘

गेली 6-7 वर्षे पृथ्वी थिएटरमध्ये हिंदी आणि इंग्रजी नाटकांमधून काम केलेल्या प्रायोगिक नाटकांविषयी विशेष प्रेम आहे. अभिनयाचे कोणतेही औपचारिक शिक्षण न घेतल्यामुळे, भारतभरात केलेल्या वेगवेगळ्या नाटकांच्या प्रयोगांचे अनुभव, हाच आपल्या अभिनयाचा पाया असल्याचे ती सांगते. म्हणूनच ‘प्रवास आणि नाटक या दोन्ही गोष्टींनी मला व्यक्ती म्हणून घडविले आणि आयुष्याकडे सकारात्मकरित्या बघण्याचा दृष्टीकोन दिला‘ असे ती म्हणाली.

मराठी माध्यमातून शिक्षण पूर्ण करून पुढे सेंट झेविर्समधून अ‍ॅडर्व्हटाइजिंग विषयात पदवी घेतलेल्या मंजिरीने डॉक्युमेंटरी फिल्म मेकिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. अभिनयाबरोबरच फिल्म मेकिंगच्या इतर विभागांमध्ये काम करायलाही तिला तेवढीच मजा येते.

प्रसिद्ध अभिनेत्री कलकी कोचीनची भूमिका असलेल्या आणि आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलमध्ये नावाजलेल्या ‘रिबन‘ या चित्रपटाचे संवादही मंजिरीने राघव दत्त यांच्याबरोबर लिहिले आहेत. सध्या जरी मुख्यतः अभिनेत्री म्हणून काम करत असले, तरी माझ्या शिक्षणाचा मला पदोपदी उपयोग होत असल्याचे तिने सांगितले.

झोया अख्तर या प्रतिभावान डायरेक्टरच्या ‘आमेर‘ या शॉर्ट फिल्ममध्ये एका फुलविक्रेत्या बाईची भूमिका करतानाच्या अनुभवाविषयी बोलताना ती म्हणाली की तिला वेगळ्या धाटणीच्या विषयांवर काम करायला नेहमीच आवडते आणि त्यातही स्त्रीप्रधान भूमिका प्रचंड आकर्षित करतात. ‘सध्या मराठी नाटक आणि फिल्म्सच्या प्रतलावर होणारे नवनवीन प्रयोग आणि हाताळले जाणारे वेगवेगळे विषय हे आमच्या पिढीच्या कलाकारांचं सुदैव आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.