Pune: लॉकडाऊन वाढल्यास अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात

एमपीसी न्यूज – कोरोना संसर्ग अद्यापही आटोक्यात आला नसल्याने पुण्यात लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागतील अशी धास्ती वाटत आहे.

महाराष्ट्र सरकारने 18 मार्च रोजी लॉकडाऊन जाहीर केला. 23 मार्चला केंद्र सरकारने 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. ती मुदत 14 एप्रिलला संपली. परंतु तरीही, कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढतच राहिल्याने राज्य आणि केंद्र सरकारने ती मुदत 3 मे पर्यंत आणखी वाढवली. दरम्यान परिस्थितीचा आढावा घेतला असता, पुण्यातील रुग्णांची संख्या वाढतच राहिली. त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी 3 मे नंतरही वाढवावा लागेल असे नेत्यांच्या बोलण्यातून सूचित होत आहे.

छोटे उद्योग-व्यवसाय करणारे व्यावसायिक आत्ताच त्यांची ऑफिसेस बंद करण्याच्या मनःस्थितीत आहेत. कोणतीही उलाढाल होत नसताना सलग दोन महिने कामगारांना पगार तसेच जागेचे भाडे देणे परवडत नाही, असे मालकवर्गाचे म्हणणे आहे. भाडेकरु अशी नोंद असलेल्या किरकोळ व्यावसायिकांपैकी तीस टक्के व्यवसाय आगामी काळात बंदच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

छोट्या-छोट्या उद्योग-व्यवसायांमध्ये महिला वर्ग मोठ्या प्रमाणात कामाला आहे. त्यांच्या मिळकतीमुळे कुटुंबाला आर्थिक आधार मिळतो. पण, असे व्यवसायच बंद झाले तर अनेक कुटुंबाचे आर्थिक गणित कोलमडून पडणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.