Pune: विजय वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा, मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Pune: Maratha Kranti Morcha demands vijay wadettiwar resignation

एमपीसी न्यूज- सारथी संस्थेबाबत मंत्री विजय वडेट्टीवार हे चुकीची माहिती देऊन मराठा समाजाची दिशाभूल करीत आहेत. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन त्याठिकाणी दुसरा सक्षम मंत्री नेमावा आणि मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली त्वरित बैठक बोलवावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा पुणे जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे.

मराठा क्रांती मोर्चा पुणे जिल्ह्याच्या वतीने सोमवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी ही मागणी करण्यात आली. यावेळी मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कुंजीर, राजेंद्र कोंढरे, रघुनाथ चित्रे, धनंजय जाधव, बाळासाहेब आमराळे, सचिन आडेकर, श्रुतिका पाडाळे, मीना जाधव यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

सारथीची स्वायत्तता कायम रखण्याबाबत छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात आंदोलन झाल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावतीने मंत्री एकनाथ शिंदे यांनी जो शब्द दिला, तो पाळावा अशीही मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे.

सारथी संस्थेची स्वायत्तता धोक्यात आली असताना सारथी स्वायत्त आहे, अशी चुकीची माहिती मंत्री देत आहेत. सारथीमध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून चौकशी समिती नेमली आहे.

या समितीने आपला अहवाल दिलेला असताना दुसरी समिती नेमण्याचा घाट घातला जात आहे. वास्तविक पाहता पहिल्या समितीचा अहवाल नागरिकांसाठी खुला करण्यात यावा. या खात्याला विजय वडेट्टीवार न्याय देऊ शकत नसल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राजेंद्र कुंजीर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.