Pune : मराठी राजभाषा दिनानिमित्त गोविंदाग्रज ते कुसुमाग्रज वारसादर्शन फेरी

मराठी साहित्यिकांच्या 'तीर्थक्षेत्रांना' पुणेकरांचे अभिवादन

एमपीसी न्यूज- मराठी राजभाषा दिनानिमित्त इतिहास प्रेमी मंडळ, लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी, मेहुणपुरा गणेशोत्सव मंडळ व सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे मराठी साहित्यामधील ‘तीर्थक्षेत्रांना’ पुणेकरांनी अभिवादन केले. यावेळी गोविंदाग्रज ते कुसुमाग्रज या वारसादर्शन फेरीचे आयोजन करण्यात आले.

सबा पेठेतील कसबा गणपती मंदिराजवळ असलेल्या गोविंदाग्रजांच्या निवासस्थानी पिंपळ वृक्षाचे पूजन करुन सुरु झालेल्या फेरीचा समारोप सदाशिव पेठेतील कुसुमाग्रजांच्या जन्मस्थळाजवळ झाला. यावेळी साहित्यिका डॉ. संगीता बर्वे, प्र. के. घाणेकर, इतिहास अभ्यासक मोहन शेटे, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, शाहीर हेमंतराजे मावळे आदी उपस्थित होते.

या उपक्रमात त्वष्टा कासार मंडळ, निंबाळकर तालीम मंडळ, आदर्श विद्यालय मुलींची प्रशाला यांनी देखील उपक्रमात सहभाग घेतला. नाटयछटाकार दिवाकर यांच्या निवासस्थानाजवळ कार्तिक बहिरट, वेदांत कुलकर्णी यांनी टिळक व आगरकर यांच्यातील संवाद नाटयरुपाने सादर केला. द.वा.पोतदार, नाटयछटाकार दिवाकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर, आचार्य अत्रे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या निवासस्थानांना प्रत्यक्ष भेटी यांसह पुणे मराठी ग्रंथालयाला जाऊन आठवणी जागविण्यात आल्या. मराठी साहित्यिकांचे निवासस्थान, कार्य आणि वैशिष्टयांबद्दल सामान्यांना सखोल माहिती व्हावी, याकरीता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ.संगीता बर्वे म्हणाल्या, “गोविंदाग्रज, कुसुमाग्रजांसारख्या दिग्गज साहित्यिकांच्या कविता वाचून आणि ऐकून आम्ही मोठे झालो. आज अनेक कार्यक्रमांमध्ये आम्ही या कवितांचे वाचन करतो. पुण्यामध्ये अनेक साहित्यिकांनी मराठी भाषेला पुढे नेण्याकरीता मोठे कार्य केले आहे. अशा वारसादर्शन फेरीमधून ते कार्य पुणेकरांपर्यंत पोहोचणार आहे”

मोहन शेटे म्हणाले, “कुसुमाग्रजांचे निवासस्थान शोधण्याकरीता नीळकंठ बापू गोडबोले यांनी पुढाकार घेतला. महानगरपालिकेत जाऊन तेथील नोंदी शोधून त्यांनी हे ठिकाण शोधून काढले. कुसुमाग्रजांसह सर्वच साहित्यिकांच्या कविता आपल्या मनामनात रुजल्या आहेत. त्यामुळे अशा साहित्यिकांचे निवासस्थान हे तीर्थक्षेत्र आहे. त्याची जपवणूक करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे”असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.