Pune : इवल्याश्या काडेपेट्यांचा भलामोठा दुर्मिळ खजिना पुणेकरांसाठी खुला !

एमपीसी न्यूज- गाडी, घोडे, मोटारगाड्या, फुले, फळे, भाज्या, विविध आकडे असे वैविध्यपूर्ण छाप असलेल्या आणि त्यातून स्वतःचे वेगळपण सिद्ध करणा-या इवल्याश्या काडेपेट्यांचा भला मोठा दुर्मिळ खजिना आज, गुरुवारी रसिक पुणेकरांसाठी खुला झाला. बालगंधर्व दालनामध्ये संग्राहक विनायक जोशी यांच्या काडेपेट्या आणि बॉटल ओपनरचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

या प्रदर्शनाचे उदघाटन पूना गेस्ट हाऊसचे संचालक किशोर सरपोतदार आणि हुजुरपागा शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या गालिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी विनायक जोशी, सिद्धार्थ जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. काडेपेट्या आणि ओपनरचा हा संग्रह करताना नातेवाईक आणि मित्रमंडळीची खूप मदत होत असल्याची भावना विनायक जोशी यांनी यावेळी व्यक्त केली. तर उपस्थित मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

दुग्धजन्य पदार्थांच्या व्यवसायामुळे विनायक जोशी यांना अनेक ठिकाणी फिरावे लागत असे. त्यावेळी प्रत्येक गावात अनेक प्रकारच्या काडेपेट्या दिसायच्या. त्यावरील रंगसंगती आणि त्यातील विविधता यामुळे आकर्षित होऊन त्यांनी काडेपेट्यांचा संग्रह करायला सुरवात केली. काही काळानंतर प्रत्येक दुकानात जाऊन नवीन प्रकारची काडेपेटी शोधून विकत घेतल्याने त्यांचा संग्रह वाढत गेला. त्यांनी केवळ काडेपेट्या जमवल्या नाहीत, तर त्यांचा इतिहास जाणून घेण्याचा देखील प्रयत्न केला. हळूहळू इतर संग्रहकांशी ओळख झाली आणि आदानप्रदान होऊन त्यांच्या संग्रहात भर पडली.

प्रवासाचा छंद असल्याने त्यांनी परदेशातील काडेपेट्या देखील जमवल्या. आज जोशी यांच्याकडे जगभरातील विविध आकाराच्या आणि वैशिष्ट्य पूर्ण अशा 50 हजारांहून जास्त काडेपेट्यांचा संग्रह असून त्यातील दुर्मिळातील दुर्मिळ अशा सुमारे 30 हजार काडेपेट्या या प्रदर्शनात पुणेकरांना पाहता येणार आहेत. यामध्ये जगातील सर्वात छोटी म्हणजे एक सेंटीमीटरची आणि जगातील सर्वात मोठी म्हणजे एक फूट लांबीची काडेपेटी देखील आहे. तसेच आयटीसी अर्थात इंडियन टोबॅको कंपनीने काढलेल्या आय नो या मालिकेतील दुर्मिळ संग्रहाचा देखील यात समावेश आहे. तसेच रामायण, महाभारत, अष्टविनायक, अजिंठा, वेरूळ यांच्यावर आधारित चित्र मालिकांच्या काडेपेट्या या प्रदर्शनात आहेत.

याच प्रदर्शनात काडेपेट्यांबरोबर विनायक जोशी यांनी संग्रह केलेले बॉटल ओपनर देखील मांडण्यात आले आहेत. आज त्यांच्या संग्रहात 1200 पेक्षा जास्त ओपनर असून त्यात स्टील, पितळ, प्लास्टिक, लोखंड, अॅल्युममिनीयम अशा विविध धातुंचे जगभरातील दुर्मिळ आणि जुने ओपनरही आहेत.

नवीन पिढीमध्ये दुर्मिळ वस्तूंचा संग्रह करण्याची आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. आपल्या छंदाला संग्रहाचे रुप देत विनायक जोशी यांनी जमविलेल्या विविध चित्रांच्या काडेपेट्या आणि वैविध्यपूर्ण आकाराच्या बॉटल ओपनरचे हे प्रदर्शन शनिवार (दि 18) पर्यंत बालगंधर्व कलादालन येथे सकाळी 11 ते रात्री 8 या वेळेत सर्व रसिकांसाठी विनामूल्य खुले असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.