Pune : शहराच्या विकासासाठी महापौर-उपमहापौर यांनी प्रयत्न करावेत; अभिनंदनपर भाषणात सर्वपक्षीय नगरसेवकांचे मनोगत

एमपीसी न्यूज – महापौर मुरलीधर मोहोळ आणि उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी पुणे शहराच्या विकासासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन सर्वपक्षीय नगरसेवकांनी केले. पुणे महापालिकेच्या महापौरपदी मुरलीधर मोहोळ आणि उपमहापौरपदी सरस्वती शेंडगे यांची निवड झाल्यानंतर अभिनंदनपर भाषणात नगरसेवकांनी आपली मनोगते व्यक्त केली.

यावेळी दीपक मानकर म्हणाले, मुरलीधर मोहोळ महापौर झाल्याचा मला आनंद आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना संधी दिली. सामाजिक बांधिलकी खऱ्या अर्थाने त्यांनी आपल्या आयुष्यात जपली. त्यांना आमदारकी मिळाली नाही. पण, भविष्यात आमदार होणारच असल्याची मला खात्री आहे. महापौर-उपमहापौर अभिनंदन पदाची ही सभा आहे. पण, एकही प्रशासकीय अधिकारी उपस्थित नाही, हे बरोबर नाही. महापौरांच्या मान त्यांनी ठेवला पाहिजे. शिवसृष्टीचा प्रश्न मार्गी लागावा. कोथरूडमध्ये सासूनच्या धर्तीवर हॉस्पिटल व्हावे. गोरगरीब विध्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न व्हावे. नदी सुधार योजना मार्गी लागावावी. दोन महिने झाले पुरग्रस्तांचे पुनर्वसन झाले नाही. तुम्हाला आता पुण्याचे पालकत्व दिले आहे. विधानपरिषद सदस्य पदही तुम्हाला मिळावे. एक मावळ्याला महापौर पदावर काम करण्याची संधी मिळाली.

प्रशांत जगताप म्हणाले, तुम्ही कोण्या एका पक्षाचे नव्हे तर पुणेकरांचे महापौर-उपमहापौर आहात. तुमच्याकडून पुणे शहराचे प्रश्न सुटावेत.

प्रकाश कदम म्हणाले, मुरलीधर मोहोळ तुम्ही आमदार होणार होता. पण, तुम्हाला ती संधी मिळाली नाही. तुम्ही आज महापौर होणे ही मोठी बाब आहे. मंत्र्यांसारखं तुमचं हे पद आहे.

स्वप्नाली सायकर म्हणाल्या, प्रत्येक वेळी आपण दोघांचे चांगले काम राहिले. तुमच्यापासून खूप शिकायला मिळाले. स्थायी समिती अध्यक्ष असताना सर्वांना न्याय देण्याचे काम मोहोळ यांनी केले. कोथरूड मतदारसंघात महापौर मिळणे अभिमानास्पद बाब असल्याचे नगरसेविका ज्योती कळमकर यांनी सांगितले.

मोहोळ यांना आमदार होता आले नाही. पण, आता महापौर पदाची मोठी संधी दिल्याचे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.

मुळशीचा स्वाभिमान आणि कोथरूडचा अभिमान मोहोळ आहेत. आम्हाला प्रभागात व्यवस्थित मार्गदर्शन करतात. प्रभाग 12 मध्ये खूप कामे झाल्याचे वासंती जाधव म्हणाल्या.

राजकारण बाजूला ठेवून काम कराल, मला आशा आहे. माझी मैत्रीण उपमहापौर झाल्याचा आनंद असल्याचे सुजाता शेट्टी यांनी सांगितले.

तुम्ही दोघेही संधीचे सोने कराल, केवळ प्रभागाचा विचार न करता, शहराचा विचार कराल. बालगंधर्व पुनर्विकास, लहुजी वस्ताद साळवे स्मारक, शिवसृष्टीचा प्रकल्प मार्गी लागावे, अशी आशा असल्याचे अविनाश बागवे व्यक्त केली.

दीपक पोटे म्हणाले, आम्हाला मोहोळ यांच्यांकडून खूप काही शिकायला मिळाले. तुम्ही चांगले काम करा, त्यामुळे विरोधक भाजपचा प्रचार करतील. पुढील निवडणुकीतही भाजप-आरपीआय (आठवले गट) चाच महापौर-उपमहापौर होईल, यात शंकाच नाही. शेंडगे ताई यांचे आमचे कौटुंबिक सबंध आहेत. पुणे शहरातील विकासकामांना आता गती मिळणार आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीत आपली कसोटी लागणार असल्याचे अमोल बालवडकर म्हणाले.

एक चांगले नेतृत्व पुण्याला आता मिळाले आहे. मोहोळ यांच्याकडून आम्हाला खूप काही शिकायला मिळाल्याचे महेश वाबळे यांनी सांगितले.

त्यानंतर ज्योत्स्ना एकबोटे, नगरसेवक हाजी गफूर पठाण, बाबूराव चांदेरे, विशाल तांबे, हरिदास चरवड, राजेश येनपुरे, वैशाली मराठे, कालीनदी पुंडे, पल्लवी जावळे, हर्षाली माथवड, अल्पना वरपे, स्मिता वसते, महेंद्र पठारे यांनीही आपले मनोगते व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.