Pune: मुंबईत लॉकडाऊनमधील शिथिलता रद्द केल्याबद्दल धन्यवाद! पुण्यात असा निर्णय कधी? – महापौर मोहोळ

एमपीसी न्यूज – मुंबईप्रमाणेच पुण्यातही लॉकडाऊनमधील शिथिलता रद्द कधी होणार, अशा अशयाचा सवाल उपस्थित करत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी अप्रत्यक्षपणे शहरात लॉकडाऊनचे निर्बंध पुन्हा पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात महापौरांनी रात्री उशिरा ट्वीट करून मुंबई महापालिकेच्या निर्णयाचे स्वागत केले असून पुण्यात असा निर्णय कधी, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केला आहे. 

महाराष्ट्र शासनाने चार मेपासून (सोमवार) लॉकडाऊन कालावधीत काही अटी-शर्थी घालून काही सेवा सुरू करायला परवानगी दिली होती. मात्र मुंबईत देण्यात आलेली शिथिलता रद्द करण्यात आली आहे. मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी विशेष अधिकारात सर्व शिथीलता रद्द करुन केवळ अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

लॉकडाऊनदररम्यान सूट दिल्याने लोक अपेक्षित असलेली शिस्त पाळत नसल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. त्यामुळे कोरोनाचा फैलाव अधिक होण्याची दाट शक्यता आहे आणि कोरोनाचा सामना करताना इतक्या दिवसांपासून आपण घेतलेली मेहनत वाया जाऊ शकते. ही बाब लक्षात घेत आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी मुंबईसाठीची शिथितलता रद्द करण्यात आली आहे. मुंबई महापालिका आयुक्तांना दिलेल्या विशेषाधिकाराचा वापर करून, उद्या (बुधवार) पासून मुंबईत पूर्वीप्रमाणेच फक्त अत्यावश्यक सेवाच फक्त सुरू राहतील, असे आदेश दिले आहेत.

पुण्यातही मुंबईसारखीच परिस्थिती असून त्यामुळे पुण्यात आतापर्यंत केलेल्या मेहनतीवर पाणी पडेल, अशी भीती महापौर मोहोळ यांना वाटते. त्यामुळे मोहोळ यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना ट्वीट करून पुण्याबाबतही लवकरात लवकर असा निर्णय घेतला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. महापौरांच्या या मागणीला राज्यशासनाकडून तसेच पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडून कसा प्रतिसाद मिळतो, याकडे आता पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.