Pune : महापालिका महापौर-उपमहापौर निवडणुकीतही महाशिव आघाडी!

एमपीसी न्यूज – राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी काँगेस-राष्ट्रवादी-शिवसेना महाशिव आघाडीच्या बैठकांवर बैठका सुरू असताना पुणे महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडणुकीतही महाशिव आघाडी करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. शिवसेनेने वरिष्ठांना या निवडणुकीसंदर्भात माहिती दिली आहे. दिनांक 22 नोव्हेंबर रोजी महापौर – उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार आहे.

खासदार गिरीश बापट यांनी नुकतेच स्नेहभोजन आयोजित केले होते. त्यामध्ये महापौर पदाच्या निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यात आली. स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, नगरसेवक धीरज घाटे, हेमंत रासणे यांचे नाव आघाडीवर आहेत.

यावेळी पुरुष नगरसेवकालाच महापौर पद मिळणार असल्याचे बोलले जात आहे. तरीही महिला नागरसेवकांत मंजुषा नागपुरे, ज्योत्स्ना एकबोटे, नीलिमा खाडे, वर्षा तापकीर यांच्या नावाची चर्चा आहे. दिनांक 18 नोव्हेंबर रोजी महापौर – उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करता येणार आहेत.

उपमहापौर आरपीआय (आठवले गट) 5 वर्षे देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. तर, महापौर खासदार गिरीश बापट, संजयनाना काकडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गटाचा होणार, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, आमदार पदासाठी ज्यांना डावलण्यात आले होते. त्यांचा विचार महापौर पदासाठी केला जाणार असल्याची चर्चा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.