Pune : कोरोनाचे संकट कमी करण्यासाठी महापौरांनी विश्वासात घ्यावे : दीपाली धुमाळ

एमपीसी न्यूज – पालकमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करण्यापेक्षा पुणे शहरातील कोरोनाचे संकट कमी करण्यासाठी महापौरांनी विरोधी पक्षांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी केली.

स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांच्या ‘स’ यादीतून प्रत्येकी 5 लाख रुपये खर्च करून गोरगरीब नागरिकांना धान्य देण्याचे ठरले होते, त्याचे काय झाले, असा सवालही धुमाळ यांनी उपस्थित केला. पुणे शहरात कोरोना वाढत असताना महापौर विरोधी पक्षांना विचारात घेत नाही. आम्ही वारंवार यासंदर्भात महापौर आणि आयुक्तांकडे पाठपुरावा करीत आहोत.

आजपर्यंत कोरोनाबाबत किती बैठका झाल्या, विरोधी पक्षांना विश्वासात का घेतले नाही, असे अनेक सवालही उपस्थित करण्यात आले आहेत. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असताना ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात बळी जात आहेत. रुग्णही मोठ्या संख्येने वाढत आहेत.

कोरोनामुळे महापालिकेच्या अंदाजपत्रकावर परिणाम झाला आहे. उत्पन्नातही घट झाली आहे. विविध विकासकामे रखडली आहेत. मात्र, कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही. पुण्यातील कोरोनाचे संकट कमी व्हावे, यासाठी आम्ही सुरुवातीपासून सहकार्याची भूमिका घेत आहोत. मात्र, भाजप या पक्षाचे जाणूनबुजून राजकारण करीत असल्याचा आरोप धुमाळ यांनी केला आहे.

उपमुख्यामंत्री तथा पालकमंत्री अजित पवार हे वारंवार बैठका घेऊन सर्वांना विश्वासात घेऊन काम करीत आहेत. गोरगरीब नागरिकांना अन्नधान्य वाटप करण्यासाठी 5 नव्हे तर 10 लाख रुपये खर्च करण्याचे आदेश त्यांनी दिले होते.

पण, महापालिकेने उपाययोजना केल्या नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर करून आज दीड महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होत आला आहे. हातावर पोट असणाऱ्या सर्वसामान्य पुणेकरांचे अतोनात हाल होत असल्याचे दीपाली धुमाळ यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.