Pune : महापालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतीच्या पुनर्निर्माणाबाबत आज बैठक

एमपीसी न्यूज- आंबिल ओढा कॉलनीतील साने गुरूजीनगर येथील महापालिका कर्मचार्‍यांच्या वसाहतीच्या पुर्ननिर्माणाबाबत आज बुधवारी महापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये तोडगा निघण्याची चिन्हे आहेत. यासाठी स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधींची भुमिका आणि प्रशासनाची पूरक भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे.

साने गुरूजीनगर, वाकडेवाडी आणि घोरपडी पेठेतील 8 व 9 नंबर या महापालिका कर्मचार्‍यांच्या वसाहती धोकादायक झाल्या आहेत. याठिकाणी कर्मचार्‍यांची जवळपास एक हजार कुटुंब राहातात. या वसाहतींचे पुनर्निर्माण करण्यासाठी मागील काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. राहाण्यासाठी धोकादायक असलेल्या या इमारती रिक्त कराव्यात यासाठी महापालिकेने नोटीसही लावल्या आहेत.

साने गुरूजीनगरमधील एका इमारतीच्या बाल्कनीचा स्लॅब नुकताच कोसळला. यामुळे पुनर्निर्माणाचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मागील आठवड्यात सर्वसाधारण सभेमध्ये यावर जोरदार चर्चा झाली, त्यावेळी महापौर मुक्ता टिळक यांनी 17 जुलैला आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आज ही बैठक होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.