Pune : कोरोना रुग्णांवर उपचारास नकार देणाऱ्यांवर ‘मेस्मा’ – महापालिका आयुक्तांचा इशारा

Mesma - Municipal Commissioner's warning to those who refuse treatment on Corona patients

एमपीसी न्यूज – कोविड-19 रुग्णांवर उपचार करण्यास नकार देणाऱ्या डॉक्टर्स, नर्स आणि इतर संबंधित कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा कडक इशारा महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे.

पुण्यातील कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेऊन खाजगी हॉस्पिटलमधील 80 टक्के बेड पुणे महापालिकेकडून आरक्षित करण्यात येणार आहेत. बेड आरक्षित झाल्यावर कोविड- 19 रुग्णांवर उपचार करण्यास नकार देणाऱ्या डॉक्टर्स, नर्स आणि इतर संबंधित कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे, असे आयुक्तांनी ठणकावून सांगितले आहे.

महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी शहरातील सर्व खाजगी हॉस्पिटल प्रशासनास अधिसूचनेद्वारे याबाबत सूचित केले आहे. तसेच त्यांच्याकडून खाजगी हॉस्पिटलने सर्व बेडची माहिती, उपलब्ध डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय सेवक वर्गाची माहिती लेखी स्वरूपात मागविली आहे.

दोन दिवसांत ही माहीती संकलित करून सोमवारपासून बेड आरक्षित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर प्रत्येक खाजगी हॉस्पिटलने कोविड-19 रुग्णांवर दैनंदिन स्वरूपात केल्या जाणाऱ्या उपचारांची 80 टक्के बेडस बाबतची अद्ययावत माहिती महापालिका प्रशासनाला डॅश बोर्डवर दररोज सकाळी 10.30 व संध्याकाळी 4.30 वाजेपर्यंत अचूक आणि वेळेत उपलब्ध करून देणे बंधनकारक राहणार आहे.

दरम्यान, पुणे शहरात आज 6 हजारांच्या पुढे कोरोनाचे रुग्ण गेले आहेत. जून महिन्यात तर आणखी कोरोनाचे संकट गडद होणार असल्याची भीती पुणे स्मार्ट सिटीतर्फे व्यक्त करण्यात आली आहे.

त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने विविध उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. सध्या महापालिका अधिकारी – कर्मचारी रात्रंदिवस काम करून कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.