Pune Metro: 50 टक्के कामगारांची ‘घरवापसी’; पुणेकरांचे मेट्रोत बसण्याचे स्वप्न सध्या दूरच!

Pune Metro: 50% workers return to their home place; Punekar's dream of sitting in the metro is far away now!

एमपीसी न्यूज – कोरोनाचा दहशतीमुळे सर्वसामान्य पुणेकरांबरोबरच मजूर वर्गही अस्वस्थ झाला आहे. पुणे मेट्रोचे काम करणारे 50 टक्के परप्रांतीय मजुरांनी घरांची वाट धरली. त्यामुळे या मेट्रोच्या प्रकल्पावर याचा परिणाम होणार आहे.

या कामगारांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण होते. त्यामुळे हे परप्रांतीय मजूर येणार की नाही, याची कोणतीही खात्री नाही. वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट अशा 2 मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. मेट्रोच्या 2 हजार कामगारांपैकी 1 हजार 500 कामगारांनी घरवापसी केली आहे. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यांतील हे मजूर होते. सध्या केवळ 1 हजार 300 मजुरच मेट्रोच्या कामावर आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर मेट्रोचे 1 महिन्यांहून अधिक काळ काम बंद होते. 3 वर्षांत या प्रकल्पाचे काम पूर्ण करून पुणेकरांना मेट्रोत बसविण्याचे स्वप्न व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दाखविले आहे. कोरोनाचा फटका मेट्रोलाही बसला आहे.

लॉकडाउनच्या काळात मजुरांना महामेट्रोतर्फे धान्य, जीवनावश्यक वस्तू, काम बंद असले तरी मजुरीही देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. पुण्यात रोज कोरोनाचे रुग्ण आणि मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांची संख्या सातत्याने वाढत असल्याने ‘आपला गाव बरा’ म्हणून मजुरांनी गावाकडे पळ काढला आहे.

केंद्र सरकारतर्फे श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या. त्यावेळी या मजुरांनी आपल्या गावाला जाण्यासाठी पसंती दिली. दरम्यान, सध्या पुण्यात अडकलेल्या राज्यातील आणि परप्रांतीय मजुरांना रोज घरून फोन येत आहेत. ‘काम जाऊ द्या’, ‘आधी तुम्ही घरी या’, असे भावनिक आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे हे मजूर थांबण्याचा मनस्थितीत नाही. त्यांना गावाची ओढ लागली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.