Pune Metro News : मेट्रो बाधितांचे उद्यापासून पुनर्वसन

एमपीसी न्यूज – मेट्रो प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शिवाजीनगर येथील राजीव गांधीनगर व कामगार पुतळा झोपडपट्टीतील नागरिकांची हडपसर आणि विमाननगर येथील एसआरए प्रकल्पामध्ये उद्या पासून (4 जून) पुनर्वसन प्रक्रीया सुरू करण्यात येत आहे. ही प्रक्रीया 8 जून पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती एसआरएचे सीईओ राजेंद्र निंबाळकर यांनी दिली आहे.

महामेट्रोच्या वतीने शिवाजीनगर न्यायालयासमोरील कामगार पुतळा व राजीव गांधीनगर वसाहतीच्या जागेवर मेट्रोचे मुख्य स्टेशन उभारण्यात येणार आहे. येथील नागरिकांचे पुनर्वसन हडपसर आणि विमाननगर येथील एसआरए प्रकल्पांमध्ये करण्यात आले आहे. 24 मे पासून प्रत्यक्षात स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

पुनर्वसन केलेल्या नागरिकांना देण्यात येणार्‍या सदनिकांचे दुय्यम निबंधक कार्यालयाकडे नोंदणी करण्याची प्रक्रियाही सुरू आहे. 28 मे पर्यंत 155 सदनिकांची नोंदणी प्रक्रिया पुर्ण करण्यात आली. उर्वरीत सदनिकाधारकांच्या नोंदणीचे काम 4 जून ते 8 जून दरम्यान करण्यात येणार आहे. या कालावधीत शनिवार व रविवारची शासकिय सुट्टी असली तरी ही प्रक्रिया सह दुय्यम निबंधक कार्यालयाच्या जिल्हाधिकारी कार्यालय, एरंडवणे आणि दापोडी येथील कार्यालयात करण्यात येणार आहे.

याठिकाणी प्रथम उपस्थित राहाणार्‍या सदनिकाधारकांचे सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेदरम्यान नोंदणीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. प्रत्येक सदनिकाधारकांना टोकन देण्यात येणार असून वेळापत्रकानुसार पात्र झोपडीधारक, त्याच्यासोबत सह हक्कदार/ वारस अशा केवळ दोन व्यक्तिंना प्रवेश दिला जाणार आहे.

पुनर्वसन झालेल्या झोपडीधारकाने त्याची सध्याची झोपडी रिकामी करून सर्व घरगुती साहित्य 7 जून ते 10 जून दरम्यान घेउन जावे. यासाठी येणार्‍या खर्चाचे 4 हजार रुपये झोपडीधारकाला देण्यात येणार आहेत. नोंदणीच्या दिवशी उपस्थित न राहाणार्‍या तसेच नवीन सदनिकेचा ताबा न घेणारा झोपडीधारक सदनिका स्वीकारण्यास इच्छुक नाही असे समजून सदनिका रद्द करण्यात येईल, असे निंबाळकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.