Pune : पुणे मेट्रो मार्ग 1 हिंजवडी ते शिवाजीनगर ‘पीएमआरडीए’कडून टाटा – सिमेन्स कंपनीस प्रकल्प प्रदान 

एमपीसी न्यूज – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून राबवण्यात येणारा पुणे मेट्रो मार्ग 1 हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत टाटा व सिमेन्स कंपनीस सार्वजनिक खासगी भागीदारी (DBFOT) तत्वावर मंत्रालय, मुंबई येथे प्रदान करण्यात आला. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गित्ते यांनी टी. यु. टी. पी. एल. (टाटा) समुहाचे संजय उबाळे व सिमेन्स कंपनीचे सुनील माथूर यांना प्रकल्प प्रदान पत्र सुपूर्द केले.

हिंजवडी येथील माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राला चालना मिळणारा प्रकल्प आहे. तसेच यातून प्रदूषण मुक्ती व वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. एकूण २३ कि.मी. लांबी असलेल्या या प्रकल्पाची किंमत अंदाजे ८ हजार ३१३ कोटी रुपये आहे. केंद्र शासनाच्या नवीन मेट्रो धोरणाअंतर्गत व खासगीकरणाच्या माध्यमातून प्रस्तूत प्रकल्पाचे संकल्पन करण्यात आले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या आर्थिक साह्यातून व टाटा सिमेन्स यांच्या खाजगी गुंतवणुकीतून या प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. पुढील तीन वर्षात या प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन टाटा सिमेन्स कंपनीस पुढील ३५ वर्ष मुदतीसाठी प्रकल्प चालवण्यासाठी संकल्पन करा, बांधा, गुंतवणूक करा, चालवा व हस्तांतरित करा (DBFOT) या तत्वावर देण्यात आला आहे.

या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन, अप्पर मुख्य सचिव (वित्त) यु.पी.एस.मदान, अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी (मुख्यमंत्री कार्यालय), प्रधान सचिव डॉ. नितीन करीर (नगर विकास विभाग १), महानगर आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गित्ते (पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) तसेच टाटा समूहाचे ग्रुप चेयरमन नटराजन चंद्रशेखरन, व टाट अरोस्पेसचे बनमाळी अग्रवाल व सिमेन्स समूहाचे ग्लोबल सी.इ.ओ. श्री. राल्फ हेसलबेचर, व सिमेन्स् फाईनास्नचे अॅन्थोनी कॅनिसीयो आदी मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.