Pimpri : पुणे मेट्रो सुसाट; पिंपरी-चिंचवड हद्दीतील 70 टक्के काम पूर्ण

एमपीसी न्यूज – पुणे मेट्रोचे काम पिंपरी-चिंचवड शहरात युद्ध पातळीवर सुरू आहे. पिंपरी-चिंचवड हद्दीतील सुमारे 70 टक्के काम पूर्ण झाले असून शहरातील सर्व मेट्रो स्टेशनचे काम प्रगतीपथावर आहे. डिसेंबर 2019 अखेर मेट्रोची पहिली चाचणी घेण्यात येईल, अशी माहिती पुणे मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनवणे यांनी दिली.

संत तुकाराम नगर ते फुगेवाडी या मार्गावर मेट्रोची पहिली चाचणी घेण्यात येणार आहे. चाचणी घेण्यासाठी मेट्रोचे दोन कोच नागपूर येथून मागवण्यात येणार आहे. एका मेट्रो कोचमध्ये 46 आसने असणार आहेत. तर 300 प्रवासी मेट्रोच्या एका कोचमधून प्रवास करू शकणार आहेत. सध्या एका मेट्रोमध्ये तीन कोच असणार आहेत. मात्र, भविष्यात लोकसंख्या आणि मेट्रोच्या प्रवासात होणारी वाढ लक्षात घेता ही कोच संख्या सहावर नेण्यात येणार आहे. त्या धर्तीवर मेट्रोमार्गाचे काम सुरू आहे.

ज्या मार्गावर मेट्रोची चाचणी घेण्यात येणार आहे. त्या मार्गावरील पाहिले आणि शेवटच्या स्टेशनचे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्यात अन्य स्टेशनचे काम केले जाणार आहे. संत तुकाराम नगरच्या बाजूने इलेक्ट्रिक पोलचे काम सुरू झाले आहे. 48 इलेक्ट्रिक पोल उभारण्यात आले आहेत. याचा मार्गावर 11.4 किलोमीटरचा रेल्वे ट्रॅक देखील अंथरण्यात आला आहे.

नाशिक फाटा ते चाकण मेट्रो डीपीआर

नाशिकफाटा ते चाकण या मार्गावरील मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येत आहे. तसेच या मार्गावर असलेली लोकवस्ती, शहरीकरण आणि अन्य बाबी लक्षात घेत मेट्रोची आवश्यकता पडताळण्यात येत आहे. सुरुवातीला मेट्रोची आवश्यकता नसल्यास इलेवेटेड (उड्डाणपुलावरील) इलेक्ट्रिक बस वाहतूक हा पर्याय असू शकतो. त्यावर देखील चर्चा सुरू आहे.

कामगारांचे पगार थकवणा-या कंत्राटदारांवर कारवाई

मेट्रोकडून विविध भागांचे काम करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. त्यानुसार वेगवेगळ्या कंपन्यांना कामे देण्यात आली आहेत. मेट्रो स्टेशनचे काम करणा-या ठेकेदाराने कामगारांचे पगार रखडवले होते. त्यामुळे कामगारांनी काम बंद आंदोलन केले होते. या प्रकरणात मेट्रोकडून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात आली आहे. त्या ठेकेदाराकडून आठ मेट्रो स्टेशनचे काम काढून घेण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.