Pune Metro : पुणे मेट्रो सेवा आता वनाज ते रुबी हॉलपर्यंत, महामेट्रोचं नियोजन

एमपीसी न्यूज : : गेल्या वर्षभरात नव्या कोणत्याही स्टेशनची भर घालण्यात अपयशी ठरल्याने आता शिवाजीनगर न्यायालयाऐवजी (सिव्हिल कोर्ट) आणखी तीन स्टेशन (Pune Metro) जोडून वनाझ ते रुबी हॉल दरम्यान सेवा सुरू करण्याची चाचपणी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून (महामेट्रो) केली जात आहे. येत्या मार्चपर्यंत सर्व कामे पूर्ण करून मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या (सीएमआरएस) तपासणीनंतर ही सेवा पुणेकरांसाठी खुली करण्याची महामेट्रोची योजना आहे.

वनाझ ते गरवारे कॉलेज दरम्यानच्या मेट्रोचा विस्तार डेक्कन जिमखाना, छत्रपती संभाजीराजे उद्यान, पुणे महापालिका आणि सिव्हिल कोर्ट चार स्टेशन जोडून केला जाणार होता. सिव्हिल कोर्टच्या पुढे मंगळवार पेठ (आरटीओ कार्यालय), पुणे रेल्वे स्टेशन आणि रुबी हॉल क्लिनिक या तीन स्टेशनची 90 टक्क्यांपेक्षा अधिक कामे पूर्ण झाली आहेत.

PMPML : 66 कोटी रुपयांची थकबाकी दिल्यावर पीएमपीएमएल कंत्राटदारांचा संप मागे

या मार्गावर रुळ, विद्युतवाहक तारा, सिग्नलिंगसह इतर आवश्यक कामांची पूर्तता झाली आहे. त्यामुळे सिव्हिल कोर्टऐवजी थेट रुबी हॉल क्लिनिकपर्यंतच मेट्रो सेवेचा विस्तार करणे महामेट्रोला शक्य होणार आहे. महामेट्रोने रुबी हॉल पर्यंतची सेवा सुरू केली, तर वनाझहून (कोथरूड) थेट किंवा पिंपरी-चिंचवडहून सिव्हिल कोर्ट येथे मेट्रो बदलून पुणे रेल्वे स्टेशनपर्यंत प्रवास करणे नागरिकांना सोयीचे होणार आहे.

मागील मार्च महिन्यात मेट्रोचं उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं. वनाज ते गरवारे हा मेट्रोचा टप्पा सुरु करण्यात आला होता.(Pune Metro) त्यानंतर मेट्रोचे पुढचे टप्पे लवकरच पूर्ण होईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र वर्ष उलटून गेल्यावरही मेट्रोचा योग्य विस्तार आणि काम पूर्ण न झाल्याने  पुणेकरांनी मेट्रोकडे पाठ फिरवली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.