Pune : MHT-CET प्रवेश परीक्षेसाठी 1 जूनपर्यंत मुदतवाढ

Extension till June 1 for MHT-CET entrance exam

एमपीसी न्यूज – जुलै महिन्यात होणाऱ्या  MHT – CET प्रवेश परीक्षेसाठी यापूर्वीच अर्ज मागविण्यात आले आहेत. हे अर्ज भरण्यासाठी लिंक खुली करून देण्यात आली असून या परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे.

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी पदवी यासारख्या उच्च शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या MHT – CET या प्रवेश परीक्षेसाठी यावर्षी 5 लाखांहून अधिक अर्ज आले  आहेत.  ही परीक्षा 4 ते 31 जुलैदरम्यान होणार आहे.

याही कालावधीत परीक्षा देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 3 ते 5 ऑगस्टला पुन्हा परीक्षा होणार आहे. परंतु, यापूर्वी अर्ज करून प्रवेश पूर्ण करता आले नाही अथवा शुल्क भरले नाहीत. अशा सर्वच विद्यार्थ्यांना आता सीईटीसाठी अर्ज करता येणार आहे.

त्यासाठी दि. 26 मे ते 1 जूनपर्यंत रात्री 12 वाजपर्यंत अर्ज करण्यासाठी  मुदतवाढ देण्यात आली आहे.

MHT – CET सेलमार्फत केंद्रीय पद्धतीने व ऑनलाइनद्वारे ही प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी नियमित शुल्कासह 7 जानेवारी ते 29 फेब्रुवारी या कालावधीत अर्ज करण्याची मुदत होती. त्यानंतर विलंब शुल्कासह अर्ज करण्यासाठी 1 ते 7 मार्च अशी मुदत होती.

त्यांनतर ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरले पण शुल्क भरले नाहीत, त्यांनाही अर्ज पूर्ण करण्याची संधी देण्यात आली होती. आता पुन्हा अर्ज करता येणार असून 1 जूनपर्यंत त्यांना अर्ज करता येणार आहे.  तसेच ही शेवटची मुदतवाढ असल्याचे MHT – CET सेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.