Pune : मिलींद एकबोटे यांना झेंडेवाडीत मारहाण; ४० ते ५० जणांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी आरोप असलेले समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना सासवडमध्ये मारहाण झाली असून याप्रकरणी पोलिसांनी सुमारे ४० ते ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गोरक्षकांकडून त्यांना मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी एकबोटे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पंडित मोडक, विवेक मोडक यांच्यासह त्यांच्या ४० ते ४५ समर्थकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, सासवड येथील झेंडेवाडीत एका कार्यक्रमासाठी मिलींद एकबोटे आले असता तेथील सुमारे ४० ते ५० जणांनी एकबोटे यांच्यावर हल्ला केला. एकबोटे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्यावर मिरचीपूड फेकली.

  • सासवडमध्ये पंडित मोडक गोशाळा चालवतात. मोडक आणि एकबोटे पूर्वी एकत्र काम करत होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी एकबोटे यांनी फेसबुकवर टाकलेल्या एका पोस्टमुळे या दोघांत वाद झाला. मोडक गोशाळा चालतात. तसेच जनावरांची वाहतूक करणारी वाहने पकडून देऊन भ्रष्टाचार करतात, असा दावा एकबोटे यांनी या फेसबुक पोस्टमध्ये केला होता. या रागातून मोडक आणि त्यांच्या समर्थकांनी एकबोटे यांच्यावर हल्ला केला असावा, असे सूत्रांनी सांगितले आहे.

झेंडेवाडीतील मंदिरात एका कार्यक्रमासाठी मिलींद एकबोटे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर मोडक आणि त्यांचे समर्थक आधीपासूनच तिथे दाखल झाले होते. तिथे मोडक यांनी फेसबुक पोस्टमधील आरोपाबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता एकबोटे आणि मोडक यांच्या समर्थकांमध्ये जोरदार वाद झाला. दरम्यान, मंदिरात बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत स्थिती नियंत्रणात आणली, असेही सूत्रांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.