Pune: शहरात कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वात कमी कोरोना संसर्ग

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कोरोनाचा सर्वात कमी संसर्ग झाला असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत या भागात केवळ एक कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडला असून कोरोनाबाधित मृतांची संख्या देखील शून्य आहे. त्या खालोखाल औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचा क्रमांक लागतो. या भागात आतापर्यंत तीन कोरोना रुग्ण सापडले असून एका कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झाली आहे. 

कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय व नगर रोड- वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत देखील कोरोना नियंत्रणाखाली असल्याचे दिसून येत आहे. कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत पाच कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले असून एका कोरोनाबाधित मृताची नोंद झाली आहे. नगर रोड- वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आतापर्यंत सहा कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडले असून कोरोनाबाधित मृतांची संख्या देखील शून्य असल्याचे पहायला मिळत आहे.

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाची हद्द अजूनही शहरातील सर्वांत मोठा हॉटस्पॉट ठरत आहे. या भागात आतापर्यंत 140 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंत 16 कोरोनाबाधित रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. कसबा- विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आतापर्यंत 65 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून कोरोनाने पाच बळी घेतले आहेत. ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 70 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून कोरोनाबाधित मृतांची संख्या तीन आहे.

वानवडी-रामटेकडी भागातील मृत्यूदर चिंताजनक

वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रात कोरोनाचा मृत्यूदर खूपच जास्त असल्याची चिंताजनक बाब पुढे आली आहे. या भागात 32 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी पाचजणांचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण 15.6 टक्के आहे. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात कोरोनाबाधित मृतांची संख्या 16 असली तरी तेथील मृत्यूंचे प्रमाण हे 11.4 टक्के आहे. हे प्रमाण देशातील व राज्यातील मृत्यूच्या प्रमाणापेक्षा खूपच जास्त असल्याने त्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

शहरातील इतर क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील कोरोनाची माहिती

येरवडा-कळस-धानोरी – कोरोनाबाधित रुग्ण 52 (मृत्यू 3)

शिवाजीनगर-घोले रोड – कोरोनाबाधित रुग्ण 39 (मृत्यू 4)

धनकवडी-शंकरनगर – कोरोनाबाधित रुग्ण 32 (मृत्यू 2)

हडपसर-मुंढवा – कोरोनाबाधित रुग्ण 23 (मृत्यू 3)

बिबवेवाडी – कोरोनाबाधित रुग्ण 23 (मृत्यू 2)

वारजे-कर्वेनगर – कोरोनाबाधित रुग्ण 9 (मृत्यू 1)

सिंहगड रोड – कोरोनाबाधित रुग्ण 9 (मृत्यू 0)

महापालिका हद्दीबाहेरील 27 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.