Pune : लवासा घाटात आढळला बेपत्ता महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृतदेह; आत्महत्या केल्याचा संशय

एमपीसी न्यूज – लवासा घाटात पाच दिवसांपासून बेपत्ता झालेल्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृतदेह (बुलेट) दुचाकीसह आढळला असून त्याने आत्महत्या केल्याचा संशय प्राथमिक स्तरावर व्यक्त केला जात आहे.

अपूर्व गिरमे (वय 19) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे.

अपूर्व हा वाघोली येथील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत होता. 20 जानेवारीपासून तो बेपत्ता होता. पुण्याच्या विमानतळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी बेपत्ताची (मिसिंग) तक्रारही दाखल केली होती. लवासा घाटात बुलेट दुचाकीसह त्याचा मृतदेह सापडला. वेगात बुलेट चालवून त्याने दुचाकीसह उडी घेऊन आत्महत्या केली असेल, असा अंदाज प्राथमिक स्तरावर बांधण्यात येतो.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपूर्व 20 जानेवारी रोजी महाविद्यालयात गेला होता. त्यानंतर तो परत आलाच नाही. वडिलांनी त्याच्या मित्रांकडे चौकशी केली असता तो कॉलेजला येऊन आरटीओमध्ये जायचे असल्याचे सांगून निघून गेल्याचे सांगितले. त्यानंतर घरी परत न आल्यामुळे त्याच्या वडिलांनी मिसिंगची तक्रार दाखल केली होती. तपास करीत असताना पोलिसांना त्याच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन लवासा घाटात आढळले. त्यानुसार पोलिसांनी शोध घेतला असता लवासा घाटात अर्धवट जळालेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह सापडला. जवळच जळालेल्या अवस्थेत बुलेटही होती.

घटना घडण्यापूर्वी अपूर्वने ‘सॉरी डॅडी, माझ्यामुळे तुमची मान खाली गेली’ असा मेसेज वडिलांना पाठवला होता. त्यामुळे त्याने बुलेटसह दरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची संशय व्यक्त केला जात आहे. अधिक तपास पौड पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.