Pune : सतारीच्या झंकाराने ‘मित्र महोत्सवा’ची सांगता

एमपीसी न्यूज- मधाळ स्वर, प्रसन्नतेचा झंकार आणि सुरांची बरसात अशा भारावलेल्या वातावरणात ‘मित्र महोत्सवा’ची सांगता झाली. मंजिरी केळकर यांचा सुमधुर आवाज, खडे स्वर आणि नीलाद्रीकुमार यांच्या मोहिनी घालणाऱ्या सतार वादनाने रविवारची सांज सुखद सुरेल अनुभूती देणारी ठरली.

पुण्यातील मित्र फाउंडेशनच्या वतीने ‘मित्र महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. कर्वेनगर डीपी रस्त्यावरील पंडित फार्म्स येथे आयोजित या दोन दिवसांच्या महोत्सवाचे हे ४ थे वर्ष होते. यावेळी मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष धनंजय गोखले, लोकमान्य मल्टी पर्पज को.- ऑप. सो.चे सुशील जाधव, सुमाशिल्प ग्रुपच्या डॉ, अनुराधा नारळकर आदि मान्यवर उपस्थित होते.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची (दि. २४) सुरुवात गौरवनिधी प्रदान सोहळ्याने झाली. फाउंडेशनच्या वतीने २००४ सालापासून शास्त्रीय संगीत क्षेत्रातील वयोवृद्ध गुरुजनांना गौरव निधी दिला जातो. यावर्षी पं. सुधीर माईणकर यांना गौरव निधी तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आता पर्यंत तब्बल ६० जणांना हा गौरव निधी देण्यात आला असून रुपये ११ हजार असे याचे स्वरूप असते. तसेच यावेळी तालयोगी आश्रम व आवर्तन गुरुकुल येथील तरुण तबला वादकांना तबले व वैष्णवी अवधनी व मिताली यार्दे या गायिकांना पं. माईणकर यांच्या हस्ते शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना पं. माईणकर म्हणाले, “प्रतिष्ठित संस्थेकडून गौरव झाल्याचा फार आनंद वाटतो. माझे वय ८३ वर्षे असले तरी मी अजूनही कार्यरत आहे. माझी लेखणी व विचारमंथन सुरूच असते. सध्या मी तबला, सांगीतिक विस्तार, विद्यापीठीय शिक्षण याविषयावर लेखन करत आहे.”

तर पं. तळवलकर म्हणाले, “मित्र महोत्सव म्हणजे नुसता कार्यक्रम नसून संगीत क्षेत्रातील संस्था, विद्यार्थी यांच्या मदतीसाठी सुरु केलेली चळवळ आहे असे मला वाटते. ही बाब खरोखर कौतुकास्पद आहे. पं. माईणकर यांची माझी मैत्री ४० वर्षांपासूनची आहे. ते दिल्ली घराण्याचे तबलावादक आहेत. पण त्यांचे विचार व वादन घराण्यापुर्ते मर्यादित न राहता त्याचा विस्तार फार मोठा आहे. कलेला मनापासून दाद देणारे ते एक रसिकही आहेत.”

सांगीतिक मैफलीची सुरुवात जयपूर-अत्रौली घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका मंजिरी असनारे केळकर यांच्या गायन झाली. त्यांनी राग ‘गौरी’ने आपल्या गायनास सुरुवात केली. ‘राजन आये हमारे डेरे …’ या रचनेने रागाचा विस्तार करत उत्तम वातावरण निर्मिती केली. त्यांनतर द्रुत तीन तालात ‘सुरत मोहि मोरे मोहन की…’ ही रचना त्यांने सादर केली आणि आपल्या माधर सुरावटींनी रसिकांना मोहिनी घातली. जयपूर घराण्यात ब-याचदा गायला जात असलेला व त्यांचा आवडता राग ‘नट कामोद’ हा जोड राग त्यांनी यावेळी पेश केला. अखेर राग काफी मधील ‘ वे परिदान झुके झुक मुखडा’ हा टप्पा गाऊन त्यांनी आपल्या मैफलीचा समारोप केला. त्यांना सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), संजय देशपांडे (तबला) यांनी साथसंगत केली.

महोत्सवाचा समारोप जगविख्यात सतार वादक पंडित रविशंकर यांचे शिष्य सुप्रसिद्ध सतार वादक नीलाद्रीकुमार यांच्या वादनाने झाली. मंत्रमुग्ध करणारा सतारीचा झंकार, भोवतालचा विसर पडून सुरांच्या अनोख्या दुनियेची सैर घडविणारी ही मैफल होती. मींड रसिकांच्या पसंतीची विशेष मानकरी ठरली. त्यांनी यावेळी शुद्ध कल्याण रागात झपताल सादर केला. यावेळी त्यांनी त्यांच्या आजोबांनी शिकवलेली झिंझोटी रागातील रचना सादर केली. सुरांबरोबरच रसिकांमधून टाळ्यांच्या कडकडाटाचीही बरसात झाली. भैरवीने त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. यावेळी त्यांना तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांचे शिष्य व पुत्र सत्यजित तळवलकर यांनी तबल्याची साथसंगत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.